esakal | 'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

'रेमडेसिव्हिर' चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या (Remdesivir) साठेबाजांवर शासनाने कारवाई केली आहे. यापुढेही ती कारवाई सुरू राहील. या इंजेक्‍शनची गरज असेल तरच द्यावे, असे आदेश आरोग्य विभागासह डॉक्‍टरांनाही सरकारने दिले आहेत. राज्यात जेवढा साठा आहे, तो राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनबाबत कोणी राजकारण करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पालकमंत्र्यांनी शहरात फिरून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बाेलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज असणाऱ्यांनाच ते द्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. इंजेक्‍शनचा तुटवडा आहे, हे नक्की. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई आहे. त्यावरही पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. काही राज्यांत त्याचा मुबलक साठा आहे. मात्र, त्यांनी इंजेक्‍शन बाहेर द्यायचे नाहीत, असा निर्णय घेतला आहे. राज्यातही काही जणांकडे इंजेक्‍शनचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. अशा साठेबाजांवरही सरकारने कारवाई केली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊन या इंजेक्‍शनचा साठा कोणीही करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. तसे करणाऱ्यांवर कारवाई होईल. त्यामुळे या विषयाचे कोणीही राजकारण करू नये. कारण, हा साठा कानाकोपऱ्यातील रुग्णांना मिळावा, असा शासनाचा प्रयत्न सुरू आहे.

केडंबेत महिलांनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या

या इंजेक्‍शनचा साठा केंद्राकडे आहे. मात्र, ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, त्या प्रमाणात ते राज्याला इंजेक्‍शन देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ती स्थिती लक्षात घेऊन केंद्राने मदत करणे अपेक्षित आहे.'' जागतिक आरोग्य संघटनेने उपचाराचे काही निकष दिले आहेत. त्याप्रमाणे उपचार करणे अपेक्षित आहे. डॉक्‍टरांनी सांगितले त्याप्रमाणे उपचार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन द्यावे, असा आग्रह धरू नये. जे डॉक्‍टर गरज नसताना हे इंजेक्‍शन देत आहेत, त्यांनाही गरज नसल्यास इंजेक्‍शन देऊ नयेत, असे सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत.