लोधवड्यातील अपघातात बीडची ऊसतोड महिला ठार

फिरोज तांबोळी
Thursday, 29 October 2020

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक सुभाष वसंतराव थोरात (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) हा फरारी झाला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.

गोंदवले (जि. सातारा) : सातारा- लातूर महामार्गावरील लोधवडे (ता. माण) येथे चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या ट्रकच्या अपघातात ऊसतोडणी महिला जागीच ठार झाली. आणखी तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

हे मजूर रेठरे बुद्रुक येथील साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी निघाले होते. शोभा बाळासाहेब बनसड (वय 45) असे मृताचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील शोभा बनसड, विजयमाला रानमारे, वंदना नणवरे, दिनकर रानमारे (सर्व रा. ढोकण मोह, ता. जि. बीड) या ऊसतोड कामगारांसह अन्य चार कामगार व तीन लहान मुले ट्रकने रेठरेला (ता. कऱ्हाड) निघाले होते.

मुंबईच्या बेस्ट सेवेतील सांगली विभागाच्या कर्मचाऱ्यांची सेवा रद्द
 
ट्रकमध्ये आवश्‍यक वस्तूंनी भरलेल्या साहित्यावरच सर्व जण गाढ झोपले होते. हा ट्रक लोधवडेजवळ वळण रस्त्यावर पलटी झाला. त्या वेळी ट्रकमधील साहित्यासह प्रवासी मजूर जोरात बाहेर फेकले गेले. त्यात जबर मार लागल्याने शोभा बनसड या जागीच ठार झाल्या.

कऱ्हाडला चोवीस तास पाणीयोजना पूर्णत्वास; तांत्रिक कामे, निविदांची प्रक्रियाही पूर्ण

विजयमाला रानमारे, वंदना नणवरे, दिनकर रानमारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी दहिवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक सुभाष वसंतराव थोरात (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) हा फरारी झाला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Woman Passes Away In Lodhawade Satara News