दरे बुद्रुकची अवस्था ना घर का, ना घाट का!

दरे बुद्रुकची अवस्था ना घर का, ना घाट का!

सातारा : पालिकेच्या हद्दवाढीमुळे सातारा शहर तसेच नव्याने सहभागी झालेल्या भागातील राजकीय हालचालींना गती आली आहे. हद्दवाढीमुळे पालिकेत नव्याने सहभागी झालेल्या भागाच्या विकासाला चालना मिळणार असली तरी कागदोपत्री घोळामुळे दरे बुद्रुक (ता. सातारा) ग्रामस्थांचे राजकीय, प्रशासकीय भवितव्य सध्या अंध:कारमय बनले आहे. या ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांचा समावेश साताऱ्यात झाला असून, उर्वरित एक प्रभाग दरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मुळाला तसाच चिटकून आहे. या एका प्रभागामुळे दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे अस्तित्व सध्यातरी कागदोपत्री जिवंत असल्याने याठिकाणच्या ग्रामस्थांची अवस्था सध्या तरी ना पालिका... ना ग्रामपंचायत अशी झाली आहे. 

प्रलंबित असणाऱ्या सातारा पालिकेच्या हद्दवाढीला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली. या मंजुरीमुळे शाहूपुरी, विलासपूर या ग्रामपंचायतींचा पूर्ण भाग आणि दरे खुर्दमधील 1 ते 88 पर्यंतचे भूमापन क्रमांक पालिकेच्या हद्दीत नव्याने सहभागी झाले. 1956 मध्ये दरे बुद्रुकची ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात आली. यावेळी त्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारित यवतेश्‍वर, सांबरवाडी, जकातवाडी, दरे खुर्द (महादरे), दरे बुद्रुक (अंबेदरे), सारखळ, गवडीपासूनचा भूभाग येत होता. कालांतराने लोकसंख्येच्या निकषावर प्रत्येक गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण झाली. दरे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या दप्तरातून इतरांची वजाबाकी झाली तरी दरे खुर्द आणि दरे बुद्रुक या दोन गावठाणांची एकत्रित असणारी दरे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत काल-परवापर्यंत त्याठिकाणी कार्यरत होती. चार प्रभाग आणि 11 ग्रामपंचायत सदस्यांच्या जोरावर या ग्रामपंचायतीचे रहाटगाडगे सुरू होते. 

मध्यंतरी ग्रामपंचायतीची मुदत संपली आणि निवडणुकांच्या जोरबैठकांना वेग आला. जोरबैठका वेगात असतानाच कोरोनामुळे निवडणुका लांबवणीवर पडत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्‍त झाला. प्रशासकाच्या मदतीने गावगाडा सुरू असतानाच हद्दवाढ झाली. यात दरे बुद्रुकचा अविभाज्य भाग असणारा दरे खुर्द हा भूभाग ग्रामपंचायतीपासून तुटला व पालिकेत सहभागी झाला. दरे खुर्द या भागात दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग होते. या तीन प्रभागात नऊ तर दरे बुद्रुक येथील एका प्रभागात दोन सदस्य कार्यरत होते. दरे बुद्रुक आणि खुर्दमधील अंतर 11 किलोमीटर असल्याने इतर लोकवस्ती जोडून घेत दरे बुद्रुकमधील प्रभाग संख्या वाढविणे प्रशासकीय पातळीवर शक्‍य झाले नाही. यामुळे त्याठिकाणी फक्‍त एकच प्रभाग कायम राहिला. त्यामुळ दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचा जानाईदेवी प्रभाग आणि त्याठिकाणच्या दोन सदस्यांमुळे ग्रुप ग्रामपंचायत दरे बुद्रुकचे अस्तित्व सध्या तरी कागदोपत्री जिवंत आहे. एक प्रभाग, त्याठिकाणचे दोन सदस्य आणि सुमारे दोन हजार 859 हून लोकवस्तीचे राजकीय, प्रशासकीय अस्तित्व चुकीच्या धोरणामुळे सध्या तरी धोक्‍यात आले आहे. (क्रमश:) 

...यामुळे राजकीय कोंडी 
दरे खुर्द या भागात महादरे तसेच मोरे कॉलनी, जानकर कॉलनी, केसकर कॉलनी, समाधीचा माळ (पाटील नर्सरी परिसर) तसेच त्या लगतचा भूभाग येतो. सातारा शहराशी भौगोलिक सलगता असल्याने या भागात गेल्या काही वर्षांपासून नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढणाऱ्या वस्त्यांमुळे त्या भागातील लोकसंख्या दरे बुद्रुकच्या पेक्षा जास्त वाढली. यामुळे दरे बुद्रुक ग्रामपंचायतीचा केंद्रबिंदु आपोआपच या भागात स्थिरावला. या केंद्रबिंदुच्या जोरावरच गेली अनेक वर्षे प्रस्थापित राजकारणी दरे बुद्रुकमधील ग्रामस्थांची दर निवडणुकीत कोंडी करत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com