सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विलासकाकांचा असा झाला राजकीय प्रवास

हेमंत पवार
Monday, 4 January 2021

सातारा जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेतही कराड दक्षिण मतदार संघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून त्यांनी ठेवला. अनेक संकटे, प्रलोभने आली पण त्यांनी कधीही काँग्रेस विचारांशी फारकत घेतली नाही.

कराड : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं आज (सोमवारी) पहाटे उपचार सुरू असताना सातारा येथे निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. 

पूर्वीच्या दुर्गम डोंगराळ भागातील उंडाळे येथे जन्मलेल्या विलासराव पाटील यांना त्यांच्या वडिलांचा मोठा वारसा लाभला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचा वारसा विलासकाका यांनी पुढे चालवला. सन 1962 साली ते जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करू लागले. सन 1967 पासून ते राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सलग सात वेळा कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत ते 35 वर्ष आमदार राहिले. त्या दरम्यान त्यांनी सहकार, विधी व न्याय, माजी सैनिक कल्याण, दुग्ध विकास मंत्री म्हणून काम केले. सन 1999 ला सातारा जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लाटेतही कराड दक्षिण मतदार संघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून त्यांनी ठेवला. 

थांबा! हेल्मेट घाला, प्रवासाला निघा; कऱ्हाड पोलिसांचे आहे लक्ष

अनेक संकटे, प्रलोभने आली पण त्यांनी कधीही काँग्रेस विचारांशी फारकत घेतली नाही. काही दिवसांपूर्वी विलासकाका व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 वर्षाचे वैरत्व संपवून एकत्र काम करण्याची जाहीर कार्यक्रमात घोषणा केली. दरम्यान गेले काही दिवस त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे आज (सोमवारी) पहाटे  निधन झाले. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी उंडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विलासकाकां विषयी आणि त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामाेडी जाणून घ्या

विलासराव बाळकृष्ण पाटील
मु.पो. उंडाळे, ता. कऱ्हाड, जि.सातारा
जन्म - 15 जुलै 1938
शिक्षण - बी. ए. एल. एल. बी.

जिल्हा परिषद सदस्य 1967 के 1972

शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक 1967 के आजअखेर

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष

सातारा जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष

सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, फ्रान्स, थायलंड दौरा.

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणुन 1980 पासुन सलग सात वेळा प्रतिनिधित्व.

1991 ते 1993 - दुग्ध विकास मंत्री

1999 ते 2003 - विधी, न्याय व पुनर्वसन मंत्री 

2003 ते 2004 - सहकार मंत्री 

महाराष्ट्र शासन चीन अभ्यास दौरा 2008

स्थापन केलेल्या संस्था 

ग्रामीण विकास शिक्षण संस्था 1971

स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्था 1981

कोयना सहकारी बँक लि. कऱ्हाड 1996

रयत सहकारी साखर कारखाना लि. शेवाळेवाडी 1996

रयत बायोशुगर

रयत वस्त्रोद्योग संकुल

महत्वकांक्षी उपक्रम

1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन समाजप्रबोधन साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन.

महाराष्ट्र शासनाच्या डोंगरी विकासनिधीचे शिल्पकार

20 कलमी मुलभूत सुविधांचा कार्यक्रम राबविणारे देशातील अग्रस्थानी आमदार

वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देशातील पहिला नदीजोड प्रकल्प निर्माण करणारा भगीरथ.

जलसिंचनाच्या माध्यमातून डोंगरी भागातील 51 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवून सिंचन पॅटर्नची निर्मिती केली.
 

विलासकाकांनी लढविलेल्या निवडणुका

जिल्हा परिषद १९६७ ते १९७२ एकतर्फी विजय

जिल्हा बँक १९६८ ते आजअखेर एकतर्फी विजय/बिनविरोध

लोकसभा १९७९ - कऱ्हाड, पाटण तालुक्यातून ३२ हजार मतांची आघाडी

विधानसभा १९८० ते १९८५   २१ हजार मतांची आघाडी

विधानसभा १९८५ ते १९९०   १२ हजार मतांची आघाडी

विधानसभा १९९० ते १९९५   ३२ हजार मतांची आघाडी

विधानसभा १९९५ ते १९९९   २१ हजार मतांची आघाडी

विधानसभा १९९९ ते २००४   २३ हजार मतांची आघाडी

विधानसभा २००४ ते २००९   एक लाख मतांची आघाडी (राज्यात उच्चांकी मतांनी विजयी)

विधानसभा २००९ ते २०१४  विजयी 

- संकलन - हेमंत पवार, संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biography Of Congress Leader Vilasrao Patil Undalkar Satara Trending News