बड्डे आहे भावाचा...जल्लोष साऱ्या गावाचा...ग्रामीण भागातही बर्थडेचा फिवर... 

birthday
birthday

सातारा : 'आमच्या वेळी नव्हते असले फाजील लाड,' असे म्हणणारे आई-बाबा आणि आजी-आजोबा असताना एक पिढी वाढदिवस साजरे करत मोठी झाली. घरगुती प्रमाणात, मित्र-मैत्रिणींत पण वाढदिवस म्हणजे मज्जा असं समीकरण मनात ठेवणारी.  
पुढारी, अभिनेते, उद्योजक यांचेच वाढदिवस आणि जयंत्या व्हायच्या ही जुनी गोष्ट! वाढदिवस हा एक सण झाला आहे. त्याच्याभोवती मोठी व्यावसायिक उलाढाल वाढली आहे. शुभेच्छा देण्या-घेण्यात असलेली मजा, भेटवस्तू, पार्टी इत्यादींचे स्वरूप आर्थिक आणि सामाजिक स्तरानुसार बदलत आहे; पण एक गोष्ट कायम असते ती म्हणजे “सेलेब्रेशन मंगता है बॉस!''

'बर्थडे आहे...भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा... या गाण्यावर बेधुंद थिरकणारी तरुणाई अन् त्यांचे वाढदिवस यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. घरातील, लग्नाचा असो वा कॉलेजमधील मंडळांचा वाढदिवस आला कि, सेलिब्रेशन करण्यासाठी दोन ते तीन दिवस अगोदरच पार्टीचे नियोजन हे ठरलेलेच. मित्र-मैत्रीणींबरोबर यवतेश्वर, कास, वजराई, चारभिंत, ठोसेघर या परिसरात जल्लोष करण्यासाठी जात असतात. ज्याचा वाढदिवस असेल त्याला केकने भरवायचं, तसेच अंडी डोक्यात फोडायची अन् तलवारीने केक कापणे हा आजकालचा नवीन ट्रेंडच बनला आहे.

एकेकाळी फक्त बड्या नेत्यांचा वाढदिवस साजरे करत. परंतु सध्यस्थिती पाहता लहानमुलांपासून ते कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढतच आहे. ‘किंग नाही किंग मेकर', ‘दिलखुलास व्यक्तीमत्त्व', ‘भाऊंचे काळीज', ‘भावी सरपंच' यांसाखे फ्लेक्स लावण्याचे फॅड वाढत असल्याने फ्लेक्स व्यवसायानेही मोठी भरारी घेतली आहे. तसेच वाढदिवसाला मित्राला किंवा मैत्रिणीला काही तरी सरप्राईज द्यायच.! तसेच वेगळ गिफ्ट काय देता येईल? यासाठी तरुणाईत मोठी चढाओढ दिसून येत आहे. मात्र, या कोरोनामुळे सर्वांचा हिरमोड झाला असून बर्थडे साजरे करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लॉकडाऊनमुळे तरूणाईचा कुठेच जल्लोष पाहता येत नाही, त्यामुळे बर्थडे सेलिब्रेशन कमी होत असल्याचे दिसत आहे. आज संपुर्ण सातारा जिल्हा कोरोनाच्या खाईत ढकलला गेल्याने तरुणाईत मोठी भीती पसरली आहे. 

वाढदिवस सेलिब्रेशनला कोरोनाचा फटका...

सद्या देशात लॉकडाऊन सुरू असल्याने व कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने नागरिकांना जखडल्याने वाढदिवस सेलिब्रेशनचे प्रमाण कमी झाले आहे. वाढदिवस कोणाचाही असो एकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की, शुभेच्छांचा वर्षावच होत असतो. तसेच आपल्या प्रिय व्यक्तीला बरोबर रात्री 12 वाजता शुभेच्छा देण्यासाठी, तसेच त्याचा फोटो स्टेटस् ठेवून तो आपला किती प्रिय आहे हे दाखवण्याचा नवा पायंडा तरुणाईने शोधला आहे. त्यामुळे सद्या बर्थडे सेलिब्रेशन सोशलमीडियावरच साजरे होताना दिसत आहे.

ग्रामीण भागाला बर्थडेची भुरळ...

शहरातील नवनवीन गोष्टी ह्या ग्रामीण भाग नेहमीच आत्मसात करत असतो. पुर्वी ग्रामीण भागात वाढदिवस साजरा होणे फार दुर्मीळ गोष्ट; पण सध्यस्थिती पाहाता शहराबरोबर ग्रामीण भागातही बालचमुंपासून ते अगदी वयोवृध्दांचेही वाढदिवस साजरे होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे बर्थडेचा हा फिवर ग्रामीण भागातही धडकल्याचे चित्र आहे, असे सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षल वांगडे म्हणाले. 

संपादन- सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com