
एकही मत सुटू नये, याची काळजी भाजप घेत आहे. पदवीधरसाठी प्रामुख्याने युवकांचे मतदान जादा आहे. ते "कॅच' करण्यासाठी भाजपने "फिल्डिंग' लावली आहे. संग्रामसिंह देशमुख यांच्या पाहुण्यांची रेलचेल कऱ्हाड तालुक्यात आहे. त्याचाही फायदा करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे. छुप्या पद्धतीने पै-पाहुण्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
कऱ्हाड (जि. सातारा) : पुणे पदवीधरसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी "फिल्डिंग' लागली आहे. कऱ्हाड तालुक्यात पदवीधरसाठी सर्वाधिक 17 हजारांच्या आसपास मतदान आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर मेळावे, प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला जात आहे. त्यासह पाहुण्यारावळ्यांच्या गोतावळ्याचाही विचार करून गुप्त गाठीभेटी सुरू आहेत. संग्रामसिंह देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात पाहुणे या भागात आहेत. त्यामध्ये ते आघाडी घेतील म्हणून कॉंग्रेससह राष्ट्रावादीने ताकद लावून जागा जिंकण्यासाठी कसब पणाला लावली आहे. पक्षीय पातळीवर उलाढाली सुरू आहेत. त्यामुळे सारेच कार्यकर्तेही "चार्ज' आहेत.
भाजपने यंदा मोठ्या प्रमाणात पदवीधर निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसनेनेही ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रवादीचे अरुण लाड पुणे पदवीधरमधून आहेत. त्यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील प्रचारात उतरले आहेत. त्यांच्यासह पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते राबत आहेत. कऱ्हाड शहरात पाच हजारांवर मतदान असल्याने युवक कॉंग्रेसने कऱ्हाड शहर 'टार्गेट' केले आहे. त्यात युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. उंडाळकर व चव्हाण गटाचे मनोमिलन पुणे पदवीधरसह शिक्षक मतदारसंघाला भारी ठरते आहेत.
राष्ट्रवादीचे काही आमदार अपक्षांसोबत; संग्रामसिंह देशमुखांचा गौप्यस्फोट
भाजपतर्फे संग्रामसिंह देशमुख लढत आहेत. त्यांचे कऱ्हाड लगतचाच तालुका असल्याने त्यांचे शहरासह तालुक्यात परिचित लोक आहेत. त्यांच्याशी त्यांचा सतत संपर्क सुरू आहे. पक्षीय पातळीवरही हालचाली सुरू आहेत. भाजतर्फे नेते अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी "फिल्डिंग' लावलेली आहे. भाजपने गट, बूथ, संयोजक, सहसंयोजक यांच्या स्तरावरील त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. एकही मत सुटू नये, याची काळजी भाजप घेत आहे. पदवीधरसाठी प्रामुख्याने युवकांचे मतदान जादा आहे. ते "कॅश' करण्यासाठी भाजपने "फिल्डिंग' लावली आहे. संग्रामसिंह देशमुख यांच्या पाहुण्यांची रेलचेल कऱ्हाड तालुक्यात आहे. त्याचाही फायदा करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे. छुप्या पद्धतीने पै-पाहुण्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे पुणे पदवीधरसाठी मोठी रंगात येत आहे.
पक्षीय पातळीवर नजर...
पुणे पदवीधरसाठी कऱ्हाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीचे काम झाले आहे. त्यामुळे पदवीधरसाठी येथे मोठे महत्त्व आहे. त्या सगळ्यात मतदार नोंदणीवर आघाडीवर असलेल्या नेत्यांवर आता पक्षीय पातळीवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांना प्रचारात उतरावेच लागणार आहे. त्यांनी ज्यांना मतदार केले आहे, त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यावर भाजसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनाही लक्ष ठेऊन असणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे