पोपटपंची करणाऱ्यांना किंमत देत नाही; प्रवीण दरेकरांचा कॉंग्रेस प्रवक्त्यांना टाेला

अभिजीत खूरासणे
Sunday, 25 October 2020

कोकणात महाबळेश्वरमार्गे पोलादपूर व तेथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणे सोपे म्हणून मी महाबळेश्वर येथे थांबण्याचा निर्णय घेतला. यामध्ये थंड हवेच्या ठिकाणाचा संबंध येत नाही असे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.

महाबळेश्वर : शेतकऱ्याच्या शेतीवर कधी जायचे नाही. त्यांची दुःखे कधी समजून घ्यायची नाही. फक्त दूरचित्रवाहिनीवर पोपटपंची करायची अशांच्या पोपटपंचीला मी काडीचीही किंमत देत नाही, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांना लगावला.
 
वाईचा पाहणी दौरा अर्धवट सोडून विरोधी पक्षनेते दरेकर हे थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरला मुक्कामी गेले, अशा आशयाचे एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचे कात्रण सचिन सावंत यांनी ट्विट केले होते. या संदर्भात श्री. दरेकर बोलत होते. त्यांनी महाबळेश्वरच्या किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या हरोशी गावाताल शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची नुकतीच पाहणी केली.

शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज पुरेसे नाही, पंकजा मुडेंची उद्धव ठाकरेंच्या मदतीवर टीका

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ""वाई येथे शेती नुकसानीची पाहणीसाठी दोन गावांची निवड केली होती. तेथील शेती प्रशासनाला हाताशी धरून विरोधकांनी साफ केली. तेथे काही झालेच नाही, असे चित्र उभे केले. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला माहिती दिली. त्यामुळे मी वाई येथे केवळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्‍यक त्या सूचना केल्या.

मी पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महाबळेश्वर येथील काही गावांतील शेतीच्या पाहणीसाठी मी महाबळेश्वरला आलो. पाहणी करून महाबळेश्वर येथील अधिकाऱ्यांची बैठक घेईपर्यंत रात्री नऊ वाजले. पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण झाल्यानंतर माझा कोकण दौरा सुरू होणार होता.

पहिल्या दिवशी नाही मात्र नवव्या दिवशी झेंडू बाजार तेजीत 

कोकणात महाबळेश्वरमार्गे पोलादपूर व तेथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणे सोपे म्हणून मी महाबळेश्वर येथे थांबण्याचा निर्णय घेतला. यामध्ये थंड हवेच्या ठिकाणाचा संबंध येत नाही; परंतु ज्यांनी कधी शेतकऱ्यांचा बांध कसा असतो, ते पाहिले नाही. त्यांच्या दुःखात कधी सहभागी झाले नाही. केवळ पोपटपंची करण्यात धन्यता मानणाऱ्यांच्या वक्‍त्यव्यांना मी काडीची किंमत देत नाही.''

Edited By : Siddharth Latkar  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Pravin Darekar Criticize Congress Leader Sachin Sawant Satara News