लग्नाअगोदर बारसे घालायची अनेकांना घाई; जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला

विशाल गुंजवटे
Tuesday, 27 October 2020

आम्ही पाच वर्षे शेतकरी हिताचे काम केले आहे. कुणीही कसलेही राजकारण केले, तरी आमच्या पाठीशी आमदार गोरेंची ताकद आहे. आम्हाला नक्कीच सहा महिने मुदतवाढ मिळेल, असा विश्वासही अरुण गाेरेंनी व्यक्त केला.

बिजवडी (जि. सातारा) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा कायदा विधिमंडळाच्या सभागृहात करण्यात आला. मात्र, माण बाजार समितीबाबत आकसाने राजकारण करण्यात येत आहे. काहींना लग्नाअगोदर बारसे घालून मागच्या दाराने सत्ता मिळवायची घाई झाली आहे. ज्यांना बाजार समितीचे चेअरमन, संचालक व्हायचे आहे, अशांनी सहा महिन्यांनी निवडणूक लढवावी. मगच फेटा बांधून फोटोशेसन करावे, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
 
म्हसवड येथे बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी चेअरमन अरुण गोरे, नगराध्यक्ष तुषार वीरकर, सोनियाताई गोरे, धनाजी माने, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब खाडे, अप्पासाहेब पुकळे, अकिल काझी, बाळासाहेब पिसे, लुनेश वीरकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

माण बाजार समितीचा कारभारी कोण?
 
आमदार गोरे म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांत माण बाजार समितीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने खूप चांगले काम केले आहे. आमची सत्ता आली तेव्हाच मी पदाधिकाऱ्यांना सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याच्या आणि ज्यांनी 20 वर्षे बाजार समिती धुवून खल्ली. शेतकऱ्यांचे वाटोळे केले. त्यांच्या कार्यपद्धतीला बदला अशा सूचना केल्या होत्या. या संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले आहे. 17 व्यापारी गाळे तयार आहेत, तर आणखी 12 गाळ्यांचे काम सुरू आहे. खरे तर हे काम खूप अगोदर होणे गरजेचे होते. मात्र, आमच्या क्रियाशील संचालक मंडळाच्या कारकिर्दीत हे काम मार्गी लागले आहे. या इमारतीमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात भर पडणार आहे. शहराच्या वैभवात भर पडणार आहे. व्यापार वाढून शेतकऱ्यांची सोय होणार आहे.''

भंडाऱ्याच्या उधळणीत वाघ्या-मुरळींचा माेर्चा; आर्थिक पॅकेजची मागणी 

विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ देण्याचा कायदा करण्यात आला. कायदा राज्यात सरसकट लागू होईल, असे मला वाटले होते. मात्र, माण- खटावमध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण होते. इथेही तसेच झाले. आकसाने माण बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पालकमंत्र्यांसह सर्वच झारीतील शुक्राचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगतो, ज्यांना बाजार समितीचा चेअरमन आणि संचालक व्हायची घाई झाली आहे. त्यांनी अगोदर निवडणूक लढवावी.''
 
चेअरमन अरुण गोरे यांनी प्रास्ताविक केले. आम्ही पाच वर्षे शेतकरी हिताचे काम केले आहे. कुणीही कसलेही राजकारण केले, तरी आमच्या पाठीशी आमदार गोरेंची ताकद आहे. आम्हाला नक्कीच सहा महिने मुदतवाढ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Jaykumar Gore Challenged NCP Leaders Satara News