अजित पवारांच्या भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजेंचे सीमोल्लंघन?

बाळकृष्ण मधाळे, सिध्दार्थ लाटकर
Friday, 16 October 2020

भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही सातारा हद्दवाढीसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.

सातारा : भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे उद्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित मानले जात असतानाच, आता साताराचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रसिंहराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, ही बैठक कास धरणाची उंची वाढविण्या संदर्भातल्या पुढील कामकाजाबाबतीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या तासाभरापासून शिवेंद्रसिंहराजे आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची खात्रीशिर माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली. मात्र, ही चर्चा नेमकी कोणत्या दिशेने पुढे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

कृषी विधेयके मंजूर करून लोकशाहीचा गळा घोटला; चव्हाणांची मोदी सरकारवर सडकून टीका

यापूर्वीही सातारा हद्दवाढीसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवारांनीही सातारा हद्दवाढ करुन शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला यश मिळवून दिले होते. शिवेंद्रसिंहराजेंनी कास धरणाच्या उंचीबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, त्याच अनुषंगाने ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. याभेटीबाबत आमदार  शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यकर्त्यांनी 'ई-सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Shivendrasinghraje Meets Deputy Chief Minister Ajit Pawar In Pune Satara News