ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच बाजा मारणार; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

उमेश बांबरे
Monday, 11 January 2021

सामान्य माणसाशी नाळ व सामान्य माणसांवर प्रेम अशा अनेक गुणांपैकी या उदयनराजेंच्या गुणांमुळे ते माझे अगदी जवळचे मित्र आहेत, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी येथे आलो आहे असे खासदार गिरीश बापट यांनी नमूद केले.

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ताकदीने उतरली असून अनेक ठिकाणी पक्षाचे सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सध्या तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. साधारण अडीच हजार कार्यकर्ते निवडून येतील. त्यामुळे भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्‍वास खासदार गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केला.
 
जिल्हा संपर्क नेते म्हणून खासदार गिरीश बापट यांनी रविवारी साताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा तालुकानिहाय आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. श्री. बापट म्हणाले, ""सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रभावीपणे उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध झालेत. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे मी मानत नाही. यावेळेस आम्ही ताकदीने उतरलो आहोत. जिल्ह्यातील एकूण 876 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून 555 ठिकाणी भाजपने पॅनेल उभे केलेले आहेत. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात असून 66 ठिकाणी भाजपचे पॅनेल बिनविरोध निवडून आले आहे. प्राथमिक अंदाज पाहता अडीच हजार कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येतील, असा अंदाज आहे. गावपातळीवर पक्षीय लढती होत नाहीत. पण, आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत भाजपचे 350 सरपंच झालेले आहेत. यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल.''

गर्भवती महिलेवरील गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी; कुटुंबिय आनंदले
 
श्री. बापट म्हणाले, ""विविध योजनांच्या माध्यमातून गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत असून अनेक ग्रामपंचायतींनी त्याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे, हे कोणामुळे झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून मतांचा चांगला बेस भाजपचा तयार झालेला आहे.'' 

काकांची माझी जुनी मैत्री... 

विलासकाकांच्या घरी जाऊन मी त्यांना आदरांजली वाहणार आहे. काकांची आणि माझी जुनी मैत्री असून आम्ही दोघांनी खूप काळ एकत्र काम केलेले आहे, असे सांगून खासदार गिरीश बापट म्हणाले, ""रोज आम्ही एकत्र बसत होतो. खासदार झाल्यानंतर साताऱ्यात आल्यावर त्यांची भेट होत असे. 1995 पासून मी साताऱ्यात येत आहे. येथील 700 गावांत मी जाऊन आलेलो असून जिल्ह्यातील प्रश्‍न व राजकारणही मला माहिती आहे.'' 

साता-याला आम्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही : गिरीश बापट 

उदयनराजेंची घेतली सदिच्छा भेट 

खासदार गिरीश बापट यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, ""सामान्य माणसाशी नाळ व सामान्य माणसांवर प्रेम अशा अनेक गुणांपैकी या उदयनराजेंच्या गुणांमुळे ते माझे अगदी जवळचे मित्र आहेत, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी येथे आलो आहे.''

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Will Be In Power Says Girish Bapat Gram Panchayat Election Satara News