माळरानावर बहरली सफरचंदाची बाग

पुसेसावळीच्या मानसिंगराव माळवेंचा धाडसी प्रयोग; शेतकऱ्यांमध्ये कुतूहल
Blossomed Apple orchard Daring experiment of Mansingrao Malve of Pusesavali
Blossomed Apple orchard Daring experiment of Mansingrao Malve of Pusesavali

वडूज - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातील थंड वातावरणात येणारी लालचुटुक सफरचंद ४५ अंश पारा असलेल्या रणरणत्या उन्हात कशी येतील, असा अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल. मात्र, शेतीत धाडसाने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या पुसेसावळी (ता.खटाव) येथील प्रयोगशील शेतकरी व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी करत शेतकऱ्यांच्या कुतूहलाची किमया साधली आहे. त्यांनी लावलेली सफरचंदाची बाग सध्‍या बहरात आली आहे.

परदेशातील स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला येते, मग आपल्या शेतात का येणार नाही ? यासाठी दुष्काळी तालुक्यातील उपक्रमशील शेतकऱ्यांनी पाण्याचे दुर्भिक्ष्‍‍य असताना विविध फळबागा घेतल्या. पुसेसावळी (वंजारवाडी) येथील मानसिंगराव माळवे यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या फळबागांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. मात्र, सफरचंद लागवडीचा प्रयोग अद्याप काश्मीरमधील सफरचंद दुष्काळी भागात पिकवायची, असा चंगच माळवे यांनी बांधला. त्यासाठी त्यांनी गुगल, युट्यूबवर बराच काळ सफरचंदाच्या शेतीचा अभ्यास केला.

सफरचंदाची लागवड डिसेंबर महिन्यात करावी, असा त्यांना हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी सल्ला दिला. गेल्या वर्षी बिटरगाव (ता.करमाळा) येथील रोपवाटिकेत त्यांना एच आर ९९ ही सफरचंदाची रोपे उपलब्ध झाली. मोठ्या धाडसाने सर्वांनी दिलेला सल्ला बाजूला ठेवून त्यांनी अगदी ऐन उन्हाळ्यात रोपांची लागवड केली. युट्यूब, शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून झाडांची चांगली निगाही राखली. लागवडीनंतर १३ महिन्यांनी सफरचंदाच्या झाडाला फळधारणा झाली आहे.

कुसळे पिकणाऱ्या नागझरी फाट्यावरील माळरानात सध्या लालचुटुक सफरचंद फुलली आहेत. सुमारे १०० ग्रॅम वजनाची सफरचंदे झाडांना लागली आहेत. फळांची गोडी देखील चांगली आहे. यंदा एका झाडापासून अंदाजे पाच ते सहा किलो सफरचंद मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. माळवे यांनी तीस गुंठे क्षेत्रात सफरचंदाची तब्बल तीनशे झाडे लावली आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अनेक मान्यवर, शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या बागेला भेट देऊन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. श्री. माळवे यांनी पारंपरिक शेती न करता यापूर्वीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. १९८४ ला त्यांनी द्राक्ष, बटाटा, हरितगृहांतील फुलशेती, मत्सशेती, रोपवाटिका, इमुपालन आदी प्रयोग केले. त्यामधील काही यशस्वी झाले, तर काहीत नुकसानही सोसावे लागले आहे.

माळवेंचे कर्तृत्व अन्‌ दातृत्व

बाजारात सध्‍या सफरचंदाला चांगला दर आहे. ही फळे विकल्यास सुमारे दोन ते तीन लाख रुपये माळवे यांना मिळाले असते. मात्र, नफ्या-तोट्याचा विचार न करता माळवे यांनी बागेतील सफरचंदे बाजारात विक्री न करता भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना खायला मिळावीत, त्यांची चव घेता यावी, यासाठी ठेवली आहेत.

‘उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग केले पाहिजेत. आपल्याकडे पोषक वातावरण नसल्याने सफरचंदाची लागवड केली जात नाही. मात्र, शेतीत सफरचंद लागवडीचा प्रयोग करायचाच, अशी खूणगाठ बांधून लागवड केली. ती यशस्वीही ठरली. त्यामुळे दुष्काळी भागातही सफरचंद येतात, हे सिद्ध झाले.’

- मानसिंगराव माळवे, प्रयोगशील शेतकरी, पुसेसावळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com