वाईनच्या निषेधार्थ दंडुके घेत दंडवत ; व्यसनमुक्त युवक संघाचे आंदोलन

साताऱ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे आंदोलन; पोलिसांशी वादावादी
Bowing down protest of wine Addiction Free Youth Association
Bowing down protest of wine Addiction Free Youth Associationsakal

सातारा : शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने आज येथे दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कऱ्हाडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका केली.

हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केल्याने विलासबाबा जवळ व कार्यकर्त्यांसोबत पोलिस अधिकाऱ्यांचा वाद झाला. यावेळी अचानक आंदोलनात सहभागी झालेल्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनी विविध मान्यवर नेत्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी दंडुके काढून घेतल्यानेही काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सरकारने वाईन विक्रीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी व्यसनमुक्त युवा संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.

पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दंडवत घालून आंदोलनाची सुरवात झाली. तेथून व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. मात्र, पोलिस प्रशासनाकडून हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनकर्त्यांचे दंडुके काढून घेण्यात आले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसमवेत व्यसनमुक्त युवक संघटनेच्या नेते व कार्यकर्त्यांची वादावादीही झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..., बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...’ असा गजर करत कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. सुरवातीला श्री. जवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. मात्र, त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी श्री. कऱ्हाडकर हे उपस्थित झाले. त्यांनी यावेळी शासनाच्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,‘‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार आहे.

पण, यासंदर्भात निर्णय घेताना जनता व व्यसनमुक्त युवक संघाशी कोणतीही चर्चा केलेली नाही. यावेळेस आमच्याशी मुख्यमंत्री बोलले नाहीत. पण, अजितदादा बोलले. या महाराष्ट्रात अजितदादांची दादागिरी सुरू आहे. वाईन सगळीकडे उपलब्ध करण्याचा निर्णय लोकांना मान्य आहे का? हे त्यांनी विचारायला हवे होते. पोलिस प्रशासन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत जाऊ देत ना? आमची शिस्तबद्ध आंदोलन करणारी संघटना आहे.’’ या वेळी श्री. कऱ्हाडकर यांच्यासमवेत श्री. जवळ, दीपक जाधव, सचिन शिंदे, बाळासाहेब शेरेकर, योगेश जाधव, शहाजी काळे, सुदीप ओहोळ, तानाजी पांडोळे, रणजित कदम, राजू अडसुळे, नंदू जगताप, महादेव यादव, भानुदास वैराट आदींसह कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते.

पोलिसांकडून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न...

दंडुके घेऊन दंडवत आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. दंडवत घालण्यास पोलिसांनी विरोध केला. त्यावेळी श्री. जवळ यांनी आम्ही वाईनच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढला तर कारवाई करता. पण, लग्नाला ५०० पेक्षा जास्त माणसे असतात, राजकीय कार्यक्रमाला गर्दी होऊनही पोलिस कारवाई करत नाहीत. तुम्ही सरकारच्या दबावाखाली झुकता आणि संघटनेला आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरता, असा संतप्त सवाल पोलिस अधिकाऱ्यांना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com