
मातांनो, बालकांच्या वाढीसाठी स्तनपान करा
सातारा - बालकांची निरोगी वाढ व्हावी, प्रतिकारशक्ती वाढून कायम राहावी, यासाठी प्रसूती होताच एक तासाच्या आत बालकाला मातेने स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यात याचे प्रमाण फक्त ४६.४ टक्के असून, त्यामध्ये सुधारणा व्हावी, पिढी सुदृढ व्हावी, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन धाराऊ अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली.
श्री गौडा म्हणाले, ‘‘बालकांना मातेचे दूध देणे सर्व दृष्टीने श्रेयस्कर असते. बाळाच्या जीवनातील पहिले एक हजार दिवस शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यासाठी बाळाला आईचे दूध जन्माच्या पहिल्या तासापासून मिळणे आवश्यक असते, तसेच पहिले सहा महिने फक्त आईचे दूध देणे गरजेचे असते. मात्र, जिल्ह्यात हे प्रमाण नगण्य आहे. पहिल्या तासात स्तनपान देण्याचे राज्याचे प्रमाण ५७.५ टक्के आहे. जिल्ह्याचे प्रमाण त्यापेक्षाही कमी आहे. ते वाढावे यासाठी हे धाराऊ मिशन राबविले जात आहे.’’
या मिशन अंतर्गत आज झालेल्या कार्यशाळेत युनिसेफचे राज्य सल्लागार पांडुरंग सुदामे यांनीही स्तनपानाची गरज या विषयावर माहिती दिली. स्तनपानाचे प्रमाण वाढावे, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती ढवळे यांनी दिली. प्रसूतीनंतर स्तनपान लगेच सुरू करावे, स्तनपान योग्य पद्धतीने करावे, मुलांना स्तनपान, आहार याबाबतीत वेगळ्या रूढी परंपरा दूर व्हाव्यात, यासाठी मार्गदर्शन अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यामार्फत केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी प्रत्यक्ष गावपातळीवर गरोदर मातांसाठी शिबिरे, मिटिंग घेऊन माहिती देत आहेत. स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. हे मिशन सातत्याने राबविणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.
मिशन धाराऊ अंतर्गत...
स्तनपानाची आवश्यकता, गरोदर मातांनी घ्यावयाची काळजीबाबत पुस्तिकेच्या माध्यमातून जनजागरण
स्तनपानाच्या बाबतीत असलेल्या कुप्रथा बंद व्हाव्यात, यासाठी प्रबोधन केले जाणार
गरोदर व स्तनदा मातांसाठी हेल्पलाइन सुरू करणार
गावागावांत मार्गदर्शनासाठी धाराऊ पथकांची स्थापना
प्रसूती विभाग असणाऱ्या रुग्णालयातील प्रसूती विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
सर्व हॉस्पिटलना स्तनपानाची माहिती प्रसूत महिलांना देण्याचे सक्तीचे करणार
शिशुगृहातील बालके, अनाथ बालकांसाठी ह्यूमन मिल्क बँकेचे नियोजन
शासकीय, इतर कार्यालयात हिरकणी कक्ष उभारले जाणार
Web Title: Breastfeed For Baby Growth Mission Dharau Abhiyan By Satara Zp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..