काय सांगता! देशी वांग्याचा दर वाढताेयच

अमोल जाधव
Wednesday, 28 October 2020

आवक कमी झाल्याने वांगी दरात कमालीची वाढ झाली आहे. अतिपाऊस व रोगामुळे शेतातील वांग्याच्या काही रोपांची मर झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या रोपांना फुलकळी येऊ लागली आहे. यंदा भाज्यांचे मोठे नुकसान होत आहे अशी माहिती देशी वांगी उत्पादक मच्छिंद्र पाटील यांनी दिली.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : एरव्ही 15 रुपये पावशेर दर असलेली वांगी सध्या 100 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. बाजारात आवक घटल्याने दर भडकले असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच्या अतिपावसामुळे वांग्याचे पीक वाया गेल्यामुळे उत्पादन घटले आहे.
 
वांगे हे सामान्य माणसाच्या आहारातील मुख्य घटक आहे. बेभरवशी पावसामुळे वांग्याचे पीक वाया गेले. त्यामुळे उत्पादन कमी झाल्याने वांग्याच्या दराने उसळी घेतली आहे. त्या तुलनेत पालेभाज्या वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. सर्वसाधारणपणे वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, पावटा, कारली, गाजर, मुळा, ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरचीचा रोजच्या आहारात वापर होतो.

माणदेशी फाउंडेशनचे गोंदवल्यातील कोविड सेंटर रुग्णांना आधार : नीलम गोऱ्हे
 
त्यात वांग्याला महत्त्व आहे. शिवाय त्याचा दरही परवडणारा असल्याने सामान्यांना भाजीसाठी वांग्याचा मोठा आधार राहतो. मात्र, हीच वांगी प्रतिकिलोस 100 रुपयांचा टप्पा ओलांडत चालली आहेत. परिसरात हिरव्या, काळ्या आणि पारवी जातीची वांगी पिकतात. त्यातही हिरवा काटा आणि तत्सम लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लागवडीनंतर सर्वसाधारण आठ ते नऊ महिने वांगी उत्पन्न देतात. प्रतिकिलो 40 ते 60 रुपये हा दर राहतो. मात्र, गत आठवड्यात प्रतिकिलोस 100 रुपये दर झाल्याने ग्राहकांनी दर कमी होईपर्यंत वांग्याची भाजी खाण्यास थोडा ब्रेक दिला आहे.

आम्ही करून दाखवलं; मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनीच केला थातूर मातूरपणा : पृथ्वीराज चव्हाण 
 

आवक कमी झाल्याने वांगी दरात कमालीची वाढ झाली आहे. अतिपाऊस व रोगामुळे शेतातील वांग्याच्या काही रोपांची मर झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या रोपांना फुलकळी येऊ लागली आहे. यंदा भाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. 

- मच्छिंद्र पाटील, देशी वांगी उत्पादक, कोरेगाव

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brinjal Price Hiked In Market Satara News