व्यवसायच बंद, मग पैसे फेडणार कुठून?, चौपाटी व्यावसायिकांची खदखद

व्यवसायच बंद, मग पैसे फेडणार कुठून?, चौपाटी व्यावसायिकांची खदखद

सातारा : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील चौपाटी बंद आहे. सलग इतके दिवस व्यवसाय बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे 500 जणांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी नियमांना अधीन राहून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी चौपाटीवरील व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासन, तसेच पालिकेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन ऑगस्ट महिन्यात देऊनही त्यावर योग्य कार्यवाही न झाल्याने चौपाटीवरील व्यावसायिकांच्यात असंतोष पसरला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, तत्कालीन पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. यानंतर शासनाने विविध व्यवसाय सुरू करण्याची संबंधाची नियमावली जाहीर करत अटी व शर्थींना अधीन राहून प्रत्येक व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार सर्व व्यवसाय सुरू झाले असले तरी चौपाटी बंद आहे. सात महिने आमचे व्यवसाय बंद असून, कुटुंबांच्या तसेच कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. व्यवसाय वाढीसह इतर कारणांसाठी आम्ही विविध ठिकाणांहून कर्जे काढली आहेत. 

व्यवसाय बंद असल्याने सदर कर्जे थकली असून, ते फेडण्याची चिंता आम्हाला सतावत आहे. थकीत कर्ज आणि दररोजच्या जगण्याच्या प्रश्‍नामुळे आमची मानसिक स्थिती बिघडत चालल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. याच निवेदनात पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन नरेश जांभळे, संदीप पवार, प्रशांत लंगडे, किशोर धावडे, भाऊ जगताप, बंडू पाष्टे, विशाल साठे, सागर गोसावी, बबलू शर्मा, संजय शिंदे, शिवा शर्मा, विशाल मोरे व इतर व्यावसायिकांनी दिले आहे. हे निवेदन देऊन दोन महिने झाले तरी त्यावर कार्यवाही न झाल्याने हे व्यावसायिक पुन्हा एकदा निवेदन देण्याच्या तयारीत आहेत.  

कासवगती प्रशासन 
चौपाटीवर असणारे व्यावसायिक हे सातारा शहर परिसरातच स्थायिक आहेत. या व्यवसायावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. गेली सात महिने व्यवसाय बंद असल्याने ते युवक अडचणीत आले आहेत. हे युवक दोन्ही नेत्यांशी कोणत्या ना कोणत्या नात्याने जोडले गेलेले आहेत. आपल्या अडचणी दोन्ही नेत्यांपुढे मांडल्याचे काही व्यावसायिक सांगत आहेत. तरीही चौपाटी सुरू करण्याची कार्यवाही झालेली नाही. नेत्यांचे मौन आणि कासवगती प्रशासकीय कामकाजामुळे याठिकाणचे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. 

'ती' योजना कुचकामी 
लॉकडाउनच्या काळात व्यवसाय अडचणीत आल्याने हॉकर्ससाठी केंद्र व राज्य शासनाने संयुक्‍तपणे हॉकर्ससाठीची बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली. या कर्ज योजनेची चौपाटीसह इतर व्यावसायिकांनी पालिकेत जावून माहिती घेतली. योजनेत पात्र होण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि त्यातील कट प्रॅक्‍टिसचा दर ऐकून नको ते कर्ज असे म्हणत निघून आल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com