पदवीधर निवडणूक भाजपला 'महाविकास'ची ताकद दाखवून देण्यासाठीच; रामराजेंचा विरोधकांना टोला

राजेंद्र वाघ
Sunday, 22 November 2020

निवडणुकीचे नियोजन शेवटपर्यंत पोचल्यास आणि नियोजनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी गावपातळीवरील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यास निवडणुकीमध्ये यश निश्चित असल्याचा विश्वास सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

कोरेगाव (जि. सातारा) : 'पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक काही लोकांना दाखवून देण्यासाठी आहे', अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला. ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाचा 'टर्निंग पॉईंट' ठरणार असून, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकवटल्यास यश निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, प्रचार प्रमुख सारंग पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक, संजय झंवर, मंगेश धुमाळ आदी प्रमुख उपस्थित होते. श्री. निंबाळकर म्हणाले, "या निवडणुकीचे नियोजन शेवटपर्यंत पोचल्यास आणि नियोजनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी गावपातळीवरील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यास निवडणुकीमध्ये यश निश्चित आहे." 

विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी महाविकास आघाडी डगमगणार नाही : देसाई

पालकमंत्री पाटील म्हणाले, "गेल्या वेळेच्या भाजपच्या सरकारने सुशिक्षितांसाठी केवळ घोषणा, वल्गना केल्या. प्रत्यक्षात काहीच काम केले नाही. विरोधकांचा अपप्रचार करण्यावर जोर असतो, त्यामुळे सर्वांनी दक्ष राहून मतदान करावे. आमदार शिंदे म्हणाले, "सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. त्यामुळे जोमाने काम केल्यास विजय निश्चित आहे." वर्षांनंतर महाविकास आघाडीचा कस दाखवणारी ही निवडणूक आहे, असे नमूद करून नरेंद्र पाटील म्हणाले, "आपल्या जिल्ह्यात साहेब या आदरार्थी विशेषणाला परंपरा आहे; परंतु ज्याला घरातलेच कोणी ऐकत नाही, तो भाजपचा पदाधिकारी म्हणून मिरवतोय आणि अशाच प्रकारे अलीकडे जिल्ह्यातील एक जण नवीन साहेब म्हणून त्या पक्षात वावरतोय." सारंग पाटील, अॅड. कणसे, मेहबूब शेख, राजेंद्र शेलार यांचीही भाषणे झाली. मनोहर बर्गे यांनी प्रास्ताविक व भास्कर कदम यांनी सूत्रसंचालन केले.

पदवीधरांच्या बेकारीला भाजपच जबाबदार : जयंत पाटील 

गद्दार नेमके कोण?

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी केलेल्या सडेतोड भाषणात 'गद्दारावर लक्ष ठेवा आणि अशांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवा', असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्याचा धागा पकडून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "कोण आपल्या बरोबर असतील, नसतील. महाविकास आघाडीची धोरणे कोणी पाळतील, न पाळतील; परंतु आपण सर्वांनी मात्र या निवडणुकीत जोमाने काम करायचे आहे." या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांचा रोख कोणाकडे आहे आणि गद्दार नेमके कोण? याविषयीच्या चर्चेला सभेनंतर तोंड फुटले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Campaign Meeting Of Mahavikas Aghadi Regarding Graduate Election At Koregaon Satara News