आरफळ, कण्हेर, धोम, उरमोडीचे आवर्तन मंजूर; पालकमंत्र्यांची शिष्टाई

हेमंत पवार
Friday, 13 November 2020

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना सर्व नद्यांमधील पाणी साठा आणि शेतकऱ्यांचे लाभ क्षेत्राची माहिती घेऊन रब्बी हंगामाचे पाणी 15 नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा नदीवरील धोम, बलकवडी, कण्हेर व उरमोडी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे. रहिमतपूर परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर पालकमंत्र्यांनी आवर्तनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी फोनवरुन वस्तुस्थितीची माहिती दिली. मंत्री जयंत पाटील यांनी 15 नोव्हेंबरपासून पाणी सुरु करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे आरफळ, धोम, कण्हेर, उरमोडी कालव्याचे पाणी रब्बी हंगामासाठी मिळण्याबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक होऊ शकणार नव्हती. रहिमतपूर परिसरातील आणि आरफळ, कण्हेर, धोम आणि उरमोडी कालवा परिसरातील लाभधारकांनी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री श्री पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर त्यांनी रब्बी हंगाम आवर्तनाबाबत जलसंपदामंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. 

ठाकरे सरकारच्या दडपशाहीचा निषेध, चंद्रकांतदादांचा सेनेवर जोरदार निशाणा

जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सातारा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना सर्व नद्यांमधील पाणी साठा आणि शेतकऱ्यांचे लाभ क्षेत्राची माहिती घेऊन रब्बी हंगामाचे पाणी 15 नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बी आवर्तनाची कार्योत्तर मंजुरी घेण्याबाबतचे पत्र दिले आहे. पालकमंत्री पाटील यांनी कालव्यातील पाणी सोडण्यासाठी विशेष प्रयत्न केल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Canal Water Will Start Flowing From November 15 In Karad Area Satara News