
चक्क हजार रुपये किलो वाघाटी...
नागठाणे - लोकांच्या हौसेला तसेच श्रद्धेलाही मोल नसते. श्रद्धेपोटी नागरिक पैशाचा विचार करत नाहीत. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला उपवास सोडताना वाघाट्याची (Capparis zeylanica) भाजीच खावी, असे म्हणतात. या श्रद्धेमुळे एरव्ही ५० रुपये किलो असणाऱ्या वाघाट्याची फळांना साताऱ्याच्या मंडईत आज चक्क एक हजार रुपये किलो दर होता. पन्नास ग्रॅम (छटाक) मध्ये अवघी तीन छोटी फळे मिळत आहेत.
वाघाटे हे औषधी फळ आहे. या फळाची वर्षभर कोणी आठवणही काढत नाही. ते मिळावे, यासाठी कोणी यातायात करत नाही. पण, वर्षभर विस्मृतीत असलेल्या या फळाची आषाढी द्वादशीला लोकांनी हमखास आठवण येते. हे फळ मिळावे, यासाठी नागरिक बाजार धुंडाळत असतात. याच पार्श्वभूमीवर, आज साताऱ्याच्या भाजी मंडईत वाघाटी एक हजार रुपये किलो दराने विक्रीस होती. त्यावर खरेदीसाठी भाविकांची झुंबड होती.
सध्याच्या आधुनिक काळातही प्रथा-परंपरांचे, व्रतवैकल्यांचे महत्त्व अद्यापही अबाधित आहे. त्यामुळेच महाग असूनही आज साताऱ्यातील भाजी मंडईत ग्राहकांची नजर ही वाघाट्याच्या फळावर होती. या फळास आज चक्क ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाघाटी विक्रीला आणली होती. अशा शेतकऱ्यांची संख्यादेखील अत्यल्प होती. त्यामुळे नागरिक मिळेल त्या किमतीला किमान एखादे तरी वाघाटे मिळविण्याचा प्रयत्न करत होते. इतरवेळी फळे स्वस्त मिळतात. औषधी गुणधर्मामुळे त्याची भाजी नागरिक आवर्जून खातात.
...असे आहेत औषधी गुणधर्म
वाघाट्याला स्थानिक भाषेत वाघेटी, गोविंदफळ, गोविंदी अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये व्याघ्रनखी, कराम्भा, तपसाप्रिय अशी नावे आहेत. कोवळ्या फळाची पौष्टिक भाजी करून सेवन केले जाते. हा बहुवर्षीय काटेरी वेल असून वेलीला वाघनखांप्रमाणे चपटे काटे असतात, म्हणून तिला ‘व्याघ्रनखी वनस्पती’ असेही म्हणतात. पांढरी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असतात. फळे गोल हिरव्या रंगाची असतात. फळे पिकल्यावर लाल रंगाची होतात आणि तडकतात. त्यातून निळ्या-काळ्या रंगाच्या बिया बाहेर पडतात.
वाघाटी औषधी गुणधर्माची असून उष्ण, उत्तेजक व पित्तशामक आहे. उष्णतेमुळे अंगावर वळ, गळू आल्यास या वनस्पतीची मुळे उगाळून त्याचा लेप अंगावर लावल्यास गुण पडतो. क्षयरोग शमविण्यासाठी काढा उपयुक्त ठरतो. हे फळ कफ, वात या दोषांवर गुणकारी ठरते. सुतिकाज्वरात बाळंतणीला काढा दिल्याने ज्वर शमतो. थायरॉईड ग्रंथीची वाढ रोखण्यासाठी ही वनस्पती गुणकारी आहे. वनस्पतीचा काढा मूत्रल आहे. अंगावरील सूज उतरविण्यासाठी काढा महत्त्वाचा ठरतो.
Web Title: Capparis Zeylanica Thousands Of Rupees Per Kg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..