पुणे-बंगळूर महामार्गावरील कार अपघातात पुण्याचे दोघे जागीच ठार

राजेंद्र ननावरे
Thursday, 3 December 2020

फिर्यादी फुलचंद चतुर हे बुधवारी त्यांच्या नातेवाईकांना मारूती सुझुकी कारने (क्रमांक एम. एच. 12 एसक्यू 1195) पुणेहून बेळगाव येथे औषध आणण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी जखीणवाडी गावच्या हद्दीत अपघात झाला.

मलकापूर (ता. सातारा) : कारला अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले, तर अन्य तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जखीणवाडी गावच्या हद्दीत घडला. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

श्रीहरी तुकाराम वाघमारे (वय 48, रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), बापूसाहेब खंडेराव कांबळे (वय 50, रा. काळेवाडी, पिंपरी, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अश्‍विनी श्रीहरी वाघमारे (वय 45), रागिनी श्रीहरी वाघमारे (वय 21, रा. रा. भेकराईनगर, हडपसर, पुणे), चालक फुलचंद नवनाथ चतुर (वय 39, रा. गंगानगर फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) अशी जखमींची नावे आहेत.

कऱ्हाड, पुणे, सांगलीतून दुचाकी चोरणाऱ्याला अटक; सातारा पोलिसांकडून दहा दुचाकी हस्तगत

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी फुलचंद चतुर हे बुधवारी त्यांचे नातेवाईक श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांना त्यांच्या मारूती सुझुकी कारने (क्रमांक एम. एच. 12 एसक्यू 1195) पुणेहून बेळगाव येथे औषध आणणेसाठी निघाले होते. जखीणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत मळाईदेवी पतसंस्था समोरील चौकात कारच्या समोरून डाव्या बाजूने आलेल्या अज्ञात जोराची धडक दिली. यामध्ये श्रीहरी वाघमारे व बापूसाहेब कांबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारसाठी खाजगी हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. तर अश्‍विनी वाघमारे, रागिनी वाघमारे व चालक फुलचंद चतुर हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच घटनास्थळावरून अज्ञात वाहधारकाने वाहनासहित पोबारा केला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह अपघात विभागाचे खलिल इनामदार यांनी भेट दिली. याबाबत कारचालक श्री. चतुर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात वाहनधारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car Accident On Pune-Bangalore Highway Satara News