कऱ्हाड ः विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास लाखाला फसविले

हेमंत पवार
Friday, 14 August 2020

तो मॅसेज वाचताना क्रेडिट कार्डवरून एका अनोळखी नावावर 99 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांना दिसला.

कऱ्हाड ः येथील एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्याची एक लाखाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे गुरुवारी (ता.13) उघडकीस आले. त्यांच्या क्रेडिट कार्डची कॅश लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करत भामट्याने एक लाखाला गंडा घातला आहे. सोमवारी (ता. 10) दुपारी हा प्रकार घडला. त्याबाबत अंकुश रासकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी सांगितले, की येथील ओरियंटल इन्शुरन्स कंपनीत श्री. रासकर प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांचे सातारा येथील ऍक्‍सिस बॅंकेत बचत खाते आहे. त्या खात्यावर त्यांनी क्रेडिट कार्ड काढले आहे. ते पाच वर्षांपासून कार्यरत आहे. बहुतांशी वेळा त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी त्याचा वापर केला आहे. तीन दिवसांपूर्वी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी निघाले होते. त्या वेळी त्यांनी मोबाईलवर कॉल आला. त्यांनी ऍक्‍सिस बॅंक क्रेडिट कार्य विभागातून बोलत असल्याचे सांगितले. समोरील व्यक्तीने तुमच्याकडे असणाऱ्या क्रेडिट कार्डचे कॅश लिमिट वाढवून देतो, असे सांगितले. त्या वेळी रासकर यांनी मला त्यात रस नाही, तशी वाढही करायची नाही, असे सांगून कॉल कट केला, तरीही त्यांना अनोळखी मोबाईलवरून वारंवार फोन येत होते.

थकीत रक्कम वसूलीसाठी कऱ्हाड पालिकेकडून 17 गाळे सील

त्या वेळी ते गाडी चालवित होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घरी आल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास फोन पाहिला असता त्यांना मोबाईलवर ऍक्‍सिस बॅंकेचे मॅसेज आला. तो मॅसेज वाचताना क्रेडिट कार्डवरून एका अनोळखी नावावर 99 हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांना दिसला. श्री. रासकर यांनी त्वरित ऍक्‍सेस बॅंकेत जाऊन खात्री केली. त्या वेळी त्यांच्या खात्यातून 99 हजार रुपये दुसऱ्याच्या नावावर वर्ग झाल्याची खात्री झाली. त्यानंतर लगेच क्रेडिट कार्ड बंद केले. त्याबाबत त्यांनी गुरुवारी (ता.13) शहर पोलिसात त्याची फिर्याद दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Registered Against Unknown Citizen In Karad For Online Fraud