esakal | कॉंग्रेसचा हात बळकट करण्याचे नेत्यांपुढे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

कॉंग्रेसचा हात बळकट करण्याचे नेत्यांपुढे आव्हान

कॉंग्रेसची विचारधारा आयुष्यभर ज्यांनी जोपासली, वाढवली ते बाबा-काका पक्ष वाढीसाठी एकत्र आले. त्यातून कॉंग्रेस पक्षासाठी नवा अध्याय सुरू झालेला आहे. आगामी निवडणुकांचा विचार करून व काळाची पावले ओळखून घेण्यात आलेला हा निर्णय कॉंग्रेसचा हात बळकट करण्यास पोषक ठरेल.

कॉंग्रेसचा हात बळकट करण्याचे नेत्यांपुढे आव्हान

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड ः काळाची पावले ओळखत आगामी राजकीय रणनीतीचा विचार करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे नेते व त्यांचे गट एकत्र आले. या ऐतिहासिक क्षणात ऍड. उदयसिंह पाटील यांनीही कॉंग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा जाहीर निर्धार केला. दरम्यान, जिल्ह्यात सध्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ वगळता कॉंग्रेस क्षीण झालेली आहे. अन्य विरोधी पक्षांचा वाढता प्रभाव आणि कॉंग्रेसची अवस्था याचा विचार करता जिल्ह्यात कॉंग्रेसची नव्याने बांधणी करण्याची गरज आहे. हे शिवधनुष्य पेलून कॉंग्रेसचा हात बळकट करण्याचे आव्हान नेत्यांपुढे आहे.
 
कॉंग्रेसची विचारधारा घेऊन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे दोन्ही नेते आपल्या परीने कार्यरत आहेत. दोघांचे उद्दिष्ट एक असले, तरी मतभेदामुळे दोन्ही नेते दुरावले होते. तीन दशकांनंतर ते शुक्रवारी एका व्यासपीठावर आले. त्यामुळे कॉंग्रेसचा हात बळकट होण्यास मदत होणार आहे. मात्र, केवळ कऱ्हाड दक्षिण मतदार संघापुरतीच ताकदीने कार्यरत असलेली कॉंग्रेस जिल्ह्यात वाढवण्यासाठी यापुढील काळात मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अलीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप, शिवसेनेनेही जोरदार तयारी करून जिल्ह्यातील आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आमदार, भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन, तर कॉंग्रेसचा एकमेव आमदार आहे. खासदारही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. या तुलनेमध्ये सद्यःस्थितीत कॉंग्रेसची ताकद कऱ्हाड दक्षिणपुरतीच मर्यादित असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी यापूर्वी नेत्यांनी ज्या ताकदीने संघटितपणे प्रयत्न करायला हवे होते ते झाले नाहीत. पक्षातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी यांचे झालेले दुर्लक्ष आणि पक्षांतर्गत मतभेद पक्षासाठी मोठ्या प्रमाणात मारक ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार जयकुमार गोरे, कॉंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे दोघेही भाजपमध्ये गेले. त्यामध्ये श्री. गोरे हे भाजपकडून आमदार, तर जिल्हाध्यक्ष श्री. नाईक- निंबाळकर हे खासदार झाले. त्याचा मोठा फटका कॉंग्रेस पक्षाला बसला. त्यातून जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद कमी होऊन अन्य पक्षांची ताकद वाढली. त्याचा विचार करण्याची वेळ आता कॉंग्रेसवर आली आहे.

साम, दाम, दंडाची भीती दाखवून भाजपने पळवले कॉंग्रेसचे 40 नेते : पृथ्वीराजबाबांचा गौप्यस्फोट
 
कॉंग्रेसची विचारधारा आयुष्यभर ज्यांनी जोपासली, वाढवली ते बाबा-काका पक्ष वाढीसाठी एकत्र आले. त्यातून कॉंग्रेस पक्षासाठी नवा अध्याय सुरू झालेला आहे. आगामी निवडणुकांचा विचार करून व काळाची पावले ओळखून घेण्यात आलेला हा निर्णय कॉंग्रेसचा हात बळकट करण्यास पोषक ठरेल. मात्र, विरोधकांची व्यूहरचना भेदण्यासाठी आणि जिल्ह्यातील कॉंग्रेसचा कमी झालेला प्रभाव वाढवण्यासाठी यापुढील काळात बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी आता नव्या-जुण्यांची सांगड घालून वाटचाल करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पक्षांतर्गत असलेले मतभेद दूर करून एकदिलाने कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची गरज आहे. 

बायडेन यांच्या विजयानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून एकच जल्लोष करायला सुरूवात केली आहे.

उदयसिंह पाटलांची लागणार कसोटी 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांना प्रदेशवर संधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बाबांच्या मदतीने जिल्हा परिषदेवरही कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विस्कटलेली कॉंग्रेसची घडी बसवण्यासाठी उदयसिंह पाटील यांची कसोटीच लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar