मायबाप सरकार आम्हाला मल्हारवारी द्या!

रुपेश कदम
Wednesday, 7 October 2020

वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, मुला-मुलींचा शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या-मुरळींची शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

दहिवडी (जि. सातारा) : मायबाप सरकार आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या कोटम्यामध्ये एवढी मल्हारवारी द्या, असं साकडं वाघ्या-मुरळींनी सरकारला घातले. याबाबतचे निवेदन माण तालुका वाघ्या-मुरळी संघटनेचे अध्यक्ष आण्णा चंद्रकांत मगर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना दिले.
 
यावेळी वाघ्या-मुरळी संघटनेच्या उपाध्यक्षा राधा पांडुरंग पांढरे, विशाल काकडे, अनिल माने, राणी जाधव, शारदाबाई मगर, सुधीर नलवडे, दत्तात्रय कुंभार, मंगेश सावंत आदी उपस्थित होते. मागील वर्षी अतिवृष्टी, त्यानंतरची निवडणूक आचारसंहिता यामुळे या कलावंतांना जगण्यापुरतेही उत्पन्न मिळू शकले नाही. त्यानंतर कोरोनाची कुऱ्हाड कोसळल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाघ्या-मुरळी संघटनेने आमदार श्री. गोरे यांना निवेदन दिले.

डबेवाल्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा, लोकलनं प्रवास करता येणार

वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, मुला-मुलींचा शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या-मुरळींची शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी, कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन, घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी, लोककलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. लोकलावंतांच्या मागण्या सरकारकडून मान्य होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन आमदार गोरेंनी दिले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Magar Letter To BJP Leader Jaykumar Gore Satara News