सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आबालवृद्धांसह पुरुष व महिलांच्या उत्साहाला आज राजधानी साताऱ्यातील रस्त्यारस्त्यावर उधाण आले होते. काल रात्रीपासूनच शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या वाहनांतून येणाऱ्या पोवाड्यांच्या ललकारीमुळे प्रत्येकाच्या धमण्यातील रक्त सळसळत होते.
सकाळपासूनच जय भवानी जय शिवाजी या जयघोषात शाहूनगरीतील राजपथावर शिवभक्तांचे भगवे झेंडेधारी व ज्योत नेणाऱ्या मावळ्यांचे वादळ घोंघावत होते. राजधानी साताऱ्यासह जिल्ह्यातील शिवभक्तांचा हा उत्साह, भावनांची उत्कटता, ३९५ वर्षांनंतर जाणत्या राजाचे गारूड रयतेच्या हृदयावर राज्य करत असल्याचे स्पष्ट करत होता.