esakal | 'महिलांनो.. तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा'
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray

महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही, असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

'महिलांनो.. तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा'

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : महिलांनो तुम्ही कमकुवत नाही. आत्मनिर्भर व्हा, तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहिले तर त्याला धडा शिकवा. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्या पाठीशी राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केले. येथील अलंकार हॉलमध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या (Women Safety Project) ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलिस महासंचालक (महिला व बाल) राज वर्धन, जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते. (Chief Minister Uddhav Thackeray Appeal To Women In An Online Program In Satara bam92)

मुख्यमंत्री म्हणाले, ‘महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही, असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे. तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे. महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) सदैव तुमच्या पाठीशी राहतील. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.’ पोलिसाबद्दल तळमळ, आपुलकी, आस्था आहे. पोलिस १८ तास काम करतात. ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता जनतेचे रक्षण करतात. गेली दीड वर्ष कोरोनाशी (Coronavirus) आपण लढत आहोत. या लढाईत अनेक पोलिस बाधित झाले. काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्र पोलिस जनतेच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. सातारा पोलिस दलाने (Satara Police Force) महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पास विविध समाज माध्यमांचा वापर करून आधुनिकतेशी सांगड घातली आहे, असेही ते म्हणाले.

श्री. देसाई यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘पोलिस विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतात. अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा, महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरू आहेत. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे छेडछाडी, अपवृत्तींना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. याचबरोबर चार्जशिट वेळेत दाखल करणे, गुन्हा नोंदविणे, तपासणीला गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे अपप्रवृत्तींना धाक बसणार असून, गुन्ह्यांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.’ सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रकल्पाचे संगणकीय सादरीकरण केले. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आभार मानले.

Chief Minister Uddhav Thackeray Appeal To Women In An Online Program In Satara bam92

loading image