esakal | साताऱ्यात मुलाची तणावातून आत्महत्या; निरीक्षण गृहातील कारभाऱ्यांना ‘क्लीन चीट’
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

साताऱ्यात मुलाची तणावातून आत्महत्या; निरीक्षण गृहातील कारभाऱ्यांना ‘क्लीन चीट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : निरीक्षण गृहातील (observation house) विधी संघर्ष बालकांच्या आत्महत्येप्रकरणी (suicide) मुलीच्या नातेवाइकांवर (Family) गुन्हा दाखल झाला आहे; परंतु निरीक्षण गृहाच्या (observation house) कारभाराच्या अंतर्गत तपासणीत बालकाची जबाबदारी निष्पन्न होत असून, या गृहाची जबाबदारी असणाऱ्या सर्वांना महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या चौकशीत क्लीन चीट मिळाली आहे.

विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये समावेश निष्पन्न झालेल्या अल्पवयीन मुलांना न्यायालयीन कोठडीच्या कालावधीत प्रौढ व्यक्तींच्या कारागृहात ठेवण्यात येत नाही. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करूनच बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती व निरीक्षणगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचा संशय असलेल्या बालकांना सदरबझारमधील निरीक्षण गृहामध्ये ठेवण्यात येते.

मागील आठवड्यात खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची रवानगी निरीक्षण गृहात करण्यात आली होती. शनिवारी त्या मुलाने निरीक्षण गृहातील स्वच्छतागृहात आत्महत्या केली. मिरज येथे शवविच्छेदन झाल्यानंतर मुलाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले. या प्रकरणी मृताच्या भावाच्या फिर्यादीनुसार संबंधित मुलीच्या नातेवाइकांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या प्रकरणात निरीक्षण गृहातील त्रुटी व तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न निर्माण झाले होते. अधीक्षकांची निरीक्षण गृहातील उपस्थिती, काळजी वाहकांची जबाबदारी याचा प्रामुख्याने सहभाग होता.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महिला व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सकांनीही घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली होती. महिला बाल कल्याण अधिकारी शिवाजी खुडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानुसार संबंधित मुलगा हा दाखल होतानाच काहीसा अस्वस्थ असल्याचे समोर आले.

हेही वाचा: "मिडियापुढे पितळ उघडं पाडल्याने राज्य सरकारचा माझ्यावर राग"

माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, वडिलांनाही अटक केली, असे म्हणत तो तणावग्रस्त दिसत होता. त्याचे समुपदेशनही करण्यात आले होते, तरीही तणावातून त्याने स्वच्छतागृहात आत्महत्या केली. या वेळी काळजी वाहक निरीक्षण गृहाच्या आवारात हजर होता. मुलगा बराच वेळ बाहेर न आल्याने त्यांनीच दरवाजा उघडल्याने हा प्रकार समोर आला. नियमानुसार अधीक्षकांनी २४ तास निरीक्षण गृहाच्या आवारात उपस्थित असणे आवश्यक असते; परंतु त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने त्या बाहेर राहात असल्याचेही समोर आले आहे; परंतु एकंदर चौकशीत निरीक्षणगृहाची जबाबदारी असणाऱ्या कोणीही या प्रकरणाला जबाबदार नसल्याचा निष्कर्ष चौकशीत समोर आला आहे. त्यामुळे एकप्रकारे सर्वांना क्लीन चीट मिळाली आहे.

हेही वाचा: राज्यपाल नियुक्त पदांबाबत ,न्यायालयाचे निरीक्षण

निरीक्षण गृहातील विधी संघर्ष बालकांच्या आत्महत्येप्रकरणी अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीचा अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येईल.

- शिवाजी खुडे, महिला बाल कल्याण अधिकारी, सातारा

  • अहवालाप्रमाणे त्रुटींबाबतही हवी तत्परता

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत निरीक्षण गृहातील त्रुटी दूर करण्याबाबत महिला व बाल कल्याण विभागाने स्वत:च अंतर्गत तपासणी केली. त्यात सर्वांना क्लीन चीटही मिळाली आहे. चौकशी केली ते चांगलेच आहे. या अहवालाबाबत वरिष्ठ स्तरावरून पडताळणी झाल्यास कोण जबाबदार आहे, कोण नाही याची खात्रीशीर पडताळणी होऊ शकते.

वरिष्ठ कार्यालय काय करते हे समोर येईलच; परंतु अहवाल एवढीच तत्परता निरीक्षण गृहात प्रत्यक्ष असणाऱ्या त्रुटी दूर करण्याबाबतही महिला व बाल कल्याण विभागाने दाखविल्यास भविष्यातील असे प्रकार टाळता येतील, तरच कायद्याला अभिप्रेत असलेले बालकांचे संरक्षण होऊ शकते.

loading image
go to top