दादा.. खटाव, माणच्या पाणीप्रश्नाचं तेवढं बघा; दुष्काळी जनतेची अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

खटाव, माण तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.

दादा.. खटाव, माणच्या पाणीप्रश्नाचं तेवढं बघा; दुष्काळी जनतेची अपेक्षा

वडूज (सातारा) : खटाव, माण तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या जिहे-कठापूर पाणी योजनेचे (Jihe- Kathapur Water Scheme) काम अंतिम टप्प्यात आहे. उरमोडी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे गरजेचे आहे. टेंभू योजनेतून (Tembhu Scheme) मायणी परिसरासह माण तालुक्यातील गावांना पाणी देण्याची मागणी आहे. औंध परिसरातील १६ गावांचीही पाण्याची मागणी आहे. दादा... खटाव, माण तालुक्यांच्या शेतीपाणी प्रश्नाची समस्या सोडविण्यासाठी थोडे लक्ष करा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (ता. २५) खटाव, माण तालुक्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे खटाव, माणला वरदान ठरणाऱ्या पाणी योजनांच्या कामांचा ऊहापोह होण्याची शक्यता आहे. जिहे-कठापूर योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, काही क्षुल्लक काम बाकी आहे. नेर (ता. खटाव) व आंधळी (ता. माण) येथील तलावांतून दोन्ही तालुक्यांत हे पाणी सोडले जाणार आहे. शिवाय या योजनेतून खटाव तालुक्यातील दरूज, दरजाई, पेडगाव, मांडवे, तडवळे, डांभेवाडी, हिंगणे, यलमरवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ या १३ गावांना पाणी मिळावे, म्हणून नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. ४२ किलोमीटर लांबीच्या ३०० एमएम व्यासाच्या बंदिस्त पाइपमधून सुमारे १२ कोटी २५ लाख रुपये खर्चाची ही योजना आहे. या योजनेसाठी ग्रामस्थ अजितदादांना साकडे घालणार आहेत.

हेही वाचा: पत्‍नीच्या पराभवाचा शिवेंद्रसिंहराजे उदयनराजेंचा बदला घेणार?

उरमोडी योजनेतून औंध, वरूड, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, वाकळवाडी, पळशी, खरशिंगे, गोपूज, करांडेवाडी, गणेशवाडी, नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, खबालवाडी, जायगाव, अंभेरी या १६ गावांना पाणी देण्याची मागणी आहे. त्यासाठी परिसरातील नागरिकांचा गेल्या नऊ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सर्वेक्षण व प्रस्तावदेखील करण्यात आला असून, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. टेंभू योजनेतून कलेढोण व परिसरातील २१ गावे, तसेच माण तालुक्यातील कुक्कुडवाडसह पाच ते सहा गावांची पाण्याची मागणी प्रलंबित आहे. याबाबतचा पाटबंधारे विभागाने प्रस्तावदेखील केला आहे.

हेही वाचा: 'संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सोमय्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू'

खटाव- माण तालुक्यांना उरमोडी, जिहे- कठापूर, टेंभू या योजना वरदान ठरणाऱ्या आहेत. पाण्याचा प्रश्न आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असून, तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय दोन्ही तालुक्यांत औद्योगिक वसाहती सुरू झाल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होईल. खटाव, माणच्या पाणी व औद्योगिकीकरणाच्या समस्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालू.

-प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी नेते, खटाव- माण

Web Title: Citizens Demand Ajit Pawar To Solve Water Problem In Khatav Maan Taluka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top