ऑक्‍सिजन बेडसाठी रुग्णांचा संघर्ष; धाप लागून बेततेय जिवावर

उमेश बांबरे
Sunday, 20 September 2020

सध्या पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन हे तात्पुरत्या स्वरूपात ऑक्‍सिजन पुरविण्यासाठी योग्य आहे. पण, मशिनची कार्यक्षमता पाच तासाने कमी होत असल्याने या मशिनला अर्धा ते पाऊण तास थांबवावे लागते.

सातारा : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्ह्यात बेडची संख्या कमी पडू लागली आहे. आरोग्य यंत्रणेला आता लोकप्रतिनिधींचीही साथ मिळू लागली आहे. पण, दररोज सापडणाऱ्या 700 ते 800 रुग्णांपैकी सहा ते दहा टक्के रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासत आहे. परिणामी शासकीयसह खासगी रुग्णालयांतही ऑक्‍सिजन बेड वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. त्यावर आता एकच पर्याय उरला असून, सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांनी अडविलेले विविध रुग्णालयांतील बेड ऑक्‍सिजन लागणाऱ्या रुग्णांना वेळेत उपलब्ध करून दिले तरच यातून मार्ग निघणार आहे. 

कोरोनाच्या संसर्गाचा वेग जिल्ह्यात प्रचंड वाढला आहे. त्यामुळे उपलब्ध बेड आणि दररोज सापडणारे रुग्ण याचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. सध्या दररोज 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत. यापैकी पाच टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासत आहे. तर सहा ते दहा टक्के रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज भासते. अशावेळी वेळेत ऑक्‍सिजन बेड मिळाल्यास धाप लागलेल्या रुग्णांचा जीव वाचू शकतो. पण, जिल्ह्यात व्हेंटिलेटर सोडाच ऑक्‍सिजन बेडचीही आता कमतरता पडू लागली आहे. जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत. तेथे ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह थोडातरी हातभार लागला आहे. परंतु, ज्या रुग्णांना खरोखर ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता आहे, अशा रुग्णांना वेळेत बेड मिळू न शकल्याने अनेकांचा मृत्यू झालेला आहे.

साताऱ्यात घुमला मराठ्यांचा आवाज
 
सध्या जिल्ह्यात एकूण दोन हजार ऑक्‍सिजन बेड उपलब्ध आहेत. दररोज सध्या 600 ते 800 रुग्ण बाधित सापडत आहेत. यामध्ये किमान दहा टक्के म्हणजे सहा ते दहा टक्के रुग्णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता लागत आहे. त्यानुसार दररोज 60 ते 70 रुग्णांना ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता लागते. एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तो बरा होऊन बाहेर पडण्यासाठी किमान सात ते 14 दिवस लागतात. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगवेगळी असते. सध्या काही रुग्णालयांत सौम्य व लक्षणेविरहित रुग्ण ही उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यामुळे बेड अडकून राहतात. ते पूर्णपणे बरे होईपर्यंत ऑक्‍सिजनचे बेड अडकून पडतात. अशा वेळी खरोखरच गरज असलेल्या धाप लागलेल्या रुग्णांना मात्र, बेडसाठी वणवण फिरण्याची वेळ येते.

सातारा जिल्हावासीयांचे कोरोनादूतास उत्तम सहकार्य  

कोविडनंतर काळजीची गरज 

कोविड पूर्णपणे बरा झालेल्या पण, ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटर लागलेल्या रुग्णांची फुफ्फुसे काही प्रमाणात खराब झालेली असतात. अशा रुग्णांना जास्त परिश्रम घेतल्यास धाप लागल्याने ऑक्‍सिजन देण्याची आवश्‍यकता भासते. जोपर्यंत फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढत नाही, तोपर्यंत अशा रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागते. अशावेळी वेळेत ऑक्‍सिजन उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

कुमठ्यात एकाच दिवसात मिनी कोरोना केअर सेंटर सुरू 

पोर्टेबल मशिनला मर्यादा.... 

सध्या पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन हे तात्पुरत्या स्वरूपात ऑक्‍सिजन पुरविण्यासाठी योग्य आहे. पण, मशिनची कार्यक्षमता पाच तासाने कमी होत असल्याने या मशिनला अर्धा ते पाऊण तास थांबवावे लागते. अशा वेळी परिस्थिती गंभीर होऊन रुग्णाच्या जिवाशी बेतू शकते. त्यामुळे विविध रुग्णालयांत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी अडविलेले बेड स्वत:हून मोकळे करणे हाच पर्याय आहे. तरच धाप लागलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकणार आहेत.

हुतात्मा सचिन जाधव यांना साश्रूनयनांनी निरोप!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Demands To Increased Oxygen Bed Satara News