सातारा : 'राष्ट्रवादी'च्या जनता दरबारात तक्रारींचे पाढे

उमेश बांबरे
Friday, 16 October 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून राष्ट्रवादी भवनात गुरुवारी (ता.15) झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी 61 तक्रारी दाखल केल्या.

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून राष्ट्रवादी भवनात गुरुवारी (ता.15) झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी 61 तक्रारी दाखल केल्या. यामध्ये महसूल, महावितरण, रेशन व्यवस्था, सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे व नगररचना विभागाशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींवर पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचा निपटारा केला.
 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार शिंदे यांनी राष्ट्रवादी भवनात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जनता दरबारात आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. पण, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून जनता दरबार यशस्वी केला. जिल्ह्यातील 61 नागरिकांनी आपल्या विविध शासकीय विभागाशी संबंधित तक्रारी मांडल्या. 

या तक्रारींमध्ये महसूल, नगररचना विभाग, सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे, वीज कनेक्‍शन, रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी, शासकीय कार्यालयाशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. या वेळी प्रत्येक तक्रारीवर आमदार शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क करून त्याची विचारणा केली. तसेच तातडीने यावर मार्ग काढण्याची सूचना केली. त्यामुळे नागरिकांनीही अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या तक्रारींवर काही तरी निर्णय झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, निवास शिंदे, शफिक शेख आदी उपस्थित होते.
 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens lodged 61 complaints at the Janata Darbar on Thursday at the NCP building