उंब्रजकरांना हवाय नगरपंचायतीचा दर्जा; राजकीय पक्षांकडून जनतेची दिशाभूल, नागरिकांत तीव्र नाराजी

संतोष चव्हाण
Thursday, 3 December 2020

राष्ट्रीय महामार्ग उंब्रजमधून गेल्याने उंब्रजच्या प्रगतीला झपाट्याने वाव मिळाला आहे. उंब्रजची जनगणनेनुसार 13 हजार लोकसंख्या आहे. परंतु, प्रत्यक्षात 35 हजार लोकसंख्या असल्याने असणाऱ्या सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

उंब्रज (जि. सातारा) : येथे विस्तृत वसाहतीचे स्वरूप प्राप्त झाले असून, मूलभूत सोयी-सुविधांची वानवा जाणवू लागली आहे. या सोयी-सुविधांचे निवारण करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी येथे नगरपंचायत होण्यासाठी निवडणुकीत आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही ठोस काम केले नाही. गेल्या सहा वर्षांपासून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्रालयाकडे गावाला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगून आपला ऊर बडवत जनतेची दिशाभूल करत असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली असून, नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रीय महामार्ग उंब्रजमधून गेल्याने उंब्रजच्या प्रगतीला झपाट्याने वाव मिळाला आहे. उंब्रजची जनगणनेनुसार 13 हजार लोकसंख्या आहे. परंतु, प्रत्यक्षात 35 हजार लोकसंख्या असल्याने असणाऱ्या सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. उंब्रज हे कऱ्हाड व पाटण तालुक्‍याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शाळा, कॉलेज, मुलींच्या शिक्षणाची सोय, बॅंका, विविध शासकीय कार्यालये, दवाखाने, पोलिस ठाणे, सेतू, वाहनांची शोरूम, विविध संघटना, व्यापारी चाळ, बस स्थानक यांसारख्या सोयी-सुविधा असल्याने गावाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. या विस्तारीकरणाला अधिक गती मिळण्यासाठी उंब्रजला नगरपंचायत दर्जा मिळावा, असे अनेकांचे स्वप्न आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, पोस्ट ऑफिस अशी अनेक शासकीय, प्रशासकीय कार्यालये ही जागेअभावी भाड्याच्या जागेत आहेत. तर अनेक ठिकाणी शासनाच्या जागा पडून आहेत. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांना निवडणुका आल्यानंतर उंब्रजचा विकास व नगरपंचायत करण्यासाठी नुसती आश्वासनाने देण्यापलीकडे कोणतेही ठोस काम केले नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

रेल्वे फाटकाजवळचा उतार वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा; नागरिकांसाठी धोक्‍याची घंटा 

पालकमंत्र्यांकडून उंब्रजकरांना आशा : दरम्यान, विद्यमान पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांनी उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी उंब्रजला नगरपंचायत करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Citizens Of Umbraj Want The Status Of Nagar Panchayat Satara News