कऱ्हाडला चोवीस तास पाणीयोजना पूर्णत्वास; तांत्रिक कामे, निविदांची प्रक्रियाही पूर्ण

सचिन शिंदे
Thursday, 29 October 2020

कऱ्हाड शहरात प्रत्येक घरात बऱ्यापैकी पूर्ण दाबाने पाणी येत असल्याचा पालिकेचा अभ्यास झाला आहे. त्यासाठी सोमवार पेठतील नवीन व जुनी पाण्याची टाकी आणि मंगळवार पेठेतील रुक्‍मिणीनगर पाण्याच्या टाकीचा अभ्यास पालिकेने केला आहे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पाइप लिकेज, पाण्याची गती याचा अभ्यास केला आहे. त्यासाठी गस्त पथक होते. चोवीस तास नळ पाणीपुरवठा दुरुस्ती पथकही आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाडकरांसाठी महत्त्वाची ठरणारी मात्र पालिकेच्या वर्तुळात वारेमाप आरोप झाल्याने सुमारे 12 वर्षांपासून रखडलेली तब्बल 42 कोटी 18 लाखांची 24 तास पाणी योजना अखेर पूर्णत्वास जात आहे. आता योजनेची केवळ तांत्रिक कामे शिल्लक आहेत. त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आतापर्यंत तीन चाचण्या झाल्या आहेत. लवकरच तांत्रिक कामे व निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली, की योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होईल. 

24 तास पाणीपुरवठा योजना 2007 मध्ये मंजूर झाली. मंजुरीनंतर दोन वर्षांने 18 ऑगस्ट 2009 रोजी योजनेची वर्क ऑर्डर मिळाली. त्यावर बारा वर्षांपासून काम सुरू आहे. मंजूर 42 कोटी 18 लाखांपैकी शेवटच्या टप्प्यापर्यंत जवळपास 40 कोटी 40 लाख 57 हजार 523 रुपयांचा खर्च झाला होता. त्या वेळी चाचण्या घेण्यात आल्या. त्या यशस्वी झाल्यानंतर उर्वरित शिल्लक रक्कम अन्य कामांसाठी वापरण्यात आली. अद्याप काही तांत्रिक कामांसाठी निधीची गरज आहे. त्याचा ताळेबंद लावला जात आहे. अखेर एका तपानंतर ही योजना मार्गी लागत आहे. ही बाब कऱ्हाडकरांसाठी अत्यंत चांगली आहे.

काळजी करुन नका! तुमच्यावर कारवाई हाेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा व्यावसायिकांना दिलासा  

अद्यापही योजनेच्या काही महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता व्हायच्या आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात योजना कार्यान्वित होण्यासाठी कालावधी आहे. शहरात 24 पाणी कनेक्‍शनसह मीटर बसविणाऱ्यांची संख्या 13 हजार 250 इतकी आहे. त्यात सहा हजार 730 कनेक्‍शन वाढीव आहेत. मीटरची प्रक्रिया 100 टक्के पूर्ण झाली आहे. रखडलेल्या योजनेच्या दोन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. शहरात प्रत्येक घरात बऱ्यापैकी पूर्ण दाबाने पाणी येत असल्याचा पालिकेचा अभ्यास झाला आहे. त्यासाठी सोमवार पेठतील नवीन व जुनी पाण्याची टाकी आणि मंगळवार पेठेतील रुक्‍मिणीनगर पाण्याच्या टाकीचा अभ्यास पालिकेने केला आहे. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पाइप लिकेज, पाण्याची गती याचा अभ्यास केला आहे. त्यासाठी गस्त पथक होते. चोवीस तास नळ पाणीपुरवठा दुरुस्ती पथकही आहे. 

मलकापूर अतिक्रमण मोहिमेस स्थगिती : अशोकराव थोरात

अशी आहे, चोवीस तास पाणी योजना 

- योजनेसाठी शहरात 8 पाण्याच्या टाक्‍यांवर आधारित 9 झोन 
- पाण्याच्या टाक्‍यामध्ये नदीतून पाणी उचलण्यासाठी 6.7 किलोमीटरची पाइप 
- योजनेसाठी किलोमीटरची ग्रॅव्हिटी पाइप 7.30 बसवली आहे. 
- पाणी वितरणासाठी सुमारे 47 किलोमीटरच्या पाइप आहेत. 
- पुणे-बंगळूर महामार्ग हायवे क्रॉसिंग करून अकरा केव्हीएचटीची केबल बसवण्यात आली आहे. 
- महामार्गासह अन्य रस्ते क्रॉसिंग करून सहाशे पाइप बसविल्या आहेत. 
- योजनेसाठी तब्बल पंधरा लाख लिटरचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधले. 
- तीन लाख लिटरचे वॉश वॉटर पाण्याचा टॅंकही योजनेतून उभा. 
- योजनेसाठी चार पाण्याच्या टाक्‍या नवीन बांधल्या. 
- वीस लाखांच्या दोन, तर पंधरा लाखांच्या दोन पाण्याच्या टाक्‍यांचाही त्यात समावेश 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Completion Of 24 Hours Water Supply Scheme At Karad Satara News