शोध कोरोनाबाधितांचा : उद्यापासून सातारा जिल्ह्यात प्रत्येक घरात तपासणी माेहिम

उमेश बांबरे
Monday, 14 September 2020

ज्यांना ताप आहे, ज्यांची ऑक्‍सिजन लेवल कमी झाली आहे, त्यांची माहिती तातडीने फिवर क्‍लिनिकमध्ये दिली जाणार आहे. 
 

सातारा : कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी...' मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. हृदयविकार, मधुमेह, इतर आजार असलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी एक आरोग्य कर्मचारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्वयंसेवक या पथकांच्या माध्यमातून ही गृहभेट होणार आहे. यातून तपासणीसोबत घरनिहाय कोरोनाबाबत जागृतीही केली जाणार आहे. 

कोरोना संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. चाचण्या वाढविल्या असल्या तरीही अद्यापही घराघरांत कोरोना संसर्गाचे काही रुग्ण सापडत आहेत. असे रुग्ण प्राथमिक टप्प्यातच सापडले तर त्यांच्यावर तातडीने उपचार करून ते बरे होऊ शकणार आहेत. तसेच ज्यांना अद्याप संसर्ग झालेला नाही, त्यांना भविष्यात संसर्ग होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी, याची जागृती करणेही आवश्‍यक बनलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने मृत्यूदर कमी करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी...' मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अति जोखमीच्या व्यक्ती ओळखून त्यांना उपचार देणे व त्यांना कोविड प्रतिबंधात्मक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!

ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्‍टोबर या सव्वा महिन्याच्या कालावधीत राबविली जाणार आहे. यामध्ये पहिली फेरी 15 सप्टेंबर ते दहा ऑक्‍टोबर अशी 15 दिवस तर दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्‍टोबर अशी दहा दिवसांच्या कालावधीत राबविली जाणार आहे. या गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवकांचे पथक असेल. हे एक पथक दररोज 50 घरांतील व्यक्तींची तपासणी करून माहिती घेणार आहे. तर पाच ते दहा पथकांमागे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असेल. प्रत्येक घरावर स्टिकर लावणे, घरातील सदस्यांची ऍपमध्ये नोंदणी करणे, इन्फ्रारेड थर्मामीटरने तापमान, पल्स ऑक्‍सिमीटरने एसपीओ टू मोजून त्यांची नोंद करायची आहे.
 
ताप असलेल्या व्यक्तीला इतर कोणती कोरोनाशी संबंधित लक्षणे आहेत का, याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच घरातील सदस्यांना मधुमेह, कर्करोग, किडनीचे आजार, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण, दमा आदी आजार आहेत का, याची माहिती ऍपमध्ये भरली जाणार आहे. ज्यांना ताप आहे, ज्यांची ऑक्‍सिजन लेवल कमी झाली आहे, त्यांची माहिती तातडीने फिवर क्‍लिनिकमध्ये दिली जाणार आहे. 

चंदन तस्करांचा कोरोनाच्या संकटातही सुळसुळाट, मायणीत टेहळणी करून सर्रास प्रकार

कोरोनाची लक्षणे आढळल्यास रुग्णवाहिका बोलावणार... 

दरम्यान, तपासणीवेळी एखाद्या व्यक्तीला कोरोनाशी संबंधित गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा फिवर ट्रिटमेंट सेंटरला पाठविले जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची जागृती आणि बाधित पण सौम्य व लक्षणेविरहित असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conduct Covid 19 Tests In Every Home Orders Maharashtra Government Satara News