चिनी ड्रॅगनला चारीमुंड्या चित करु : माजी सैनिकांचं सळसळलं रक्त

बाळकृष्ण मधाळे
Saturday, 19 September 2020

सातारा हा शूरवीर, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हिंदुस्तानी सैन्यात जिल्ह्यातील असंख्य तरुण देशसेवा बजावत आहेत. देशावर कोणतेही संकट आले तर सातारकर शांतपणे बसून बघूच शकत नाहीत, याचाच प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला आहे.

सातारा : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. हे सर्व जवान बिहार रेजिमेंटचे होते. सुरुवातीला 3 जवान शहीद झाल्याची बातमी आली. मात्र, नंतर भारतीय सैन्यदलानेच पत्रक काढत गंभीररित्या जखमी असणाऱ्या इतर 17 जवानांचाही मृत्यू झाल्याचं कळवलं, तेव्हापासून हा वाद उफाळून आला आहे. विस्तारवादी चिनी ड्रॅगनच्या वाढत्या कुरापतींमुळे तेजस्वी लष्करी परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक अस्वस्थ झाले आहेत. युद्धजन्य परिस्थिती आलीच तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, अशा आशयाचे निवेदन नुकतेच त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.

सातारा हा शूरवीर, सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हिंदुस्तानी सैन्यात जिल्ह्यातील असंख्य तरुण देशसेवा बजावत आहेत. देशावर कोणतेही संकट आले तर सातारकर शांतपणे बसून बघूच शकत नाहीत, याचाच प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनी सैन्यांनी मोठी जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे हिंदुस्तान लष्कराला 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे. हिंदुस्तान सीमेवरील या युद्धजन्य परिस्थितीमुळे माजी सैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. 

ते देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले; सचिन जाधव अमर रहे!

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर काहीजण शासकीय कार्यालयात नोकरी करतात, तर काही पोलीस भरती होतात. अशा कर्मचाऱ्यांची 'शासकीय पुननियुक्त माजी सैनिक संघटना' कार्यरत आहे. या संघटनेच्या सातारा शाखेचे २०० कर्मचारी सभासद आहेत. सैन्यातून निवृत्त झाल्यावर भलेही त्यांनी अंगावरील वर्दी उतरवलेली असेल आणि शस्त्र खाली ठेवले असेल, पण त्यांच्या रक्तातील लढावू बाणा थोडाही कमी झालेला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 

लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे गरजले

या निवेदनात संकट काळात राज्य शासनाने आदेश दिल्यास पुनर्नियुक्त माजी सैनिक प्रत्यक्ष सीमारेषेवर जाऊन कोणत्याही प्रकारच्या सेवा देण्यास व जबाबदारी उचलण्यास सक्षम आहेत, असे नमूद केले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर, उपाध्यक्ष रमेश माने, संजय बोराटे, अशोक महाडिक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conflict In The Armies Of India And China Satara News