काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम

बाळकृष्ण मधाळे
Wednesday, 16 September 2020

पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात नव्हते, त्यामुळे मतदारसंघात उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. त्यातच शुक्रवारी काँग्रेसकडून संघटनात्मक बदल जाहीर करत महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर प्रभारी पदाची धुरा सोपवली. त्यात राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात दिग्गज समजल्या जाणा-यांपैकी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने कोणतीच जबाबदारी न सोपवल्यामुळे याची उलट-सुलट चर्चा होती.

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून मतदार संघात नव्हते. त्याबाबत समाज माध्यमांवर कऱ्हाडची ओळख कुठे आहे? अशी विचारणा करणारी पोस्ट व्हायरल होत होती. मंगळवारी (ता. १५) कऱ्हाड येथे पृथ्वीराज चव्हाण एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषदही झाली.

यावेळी आमदार चव्हाण यांनी राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल माहिती दिली. त्यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी संगिता देशमुख, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.

Video : श्रीनिवास पाटलांनी लाेकसभेत माेदी सरकारवर डागली ताेफ

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मतदार संघात नव्हता, त्यामुळे मतदारसंघात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत, अशी पोस्ट समाज माध्यमातून फिरत आहे. या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, आपल्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर पंधरा दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये होतो. वैद्यकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार प्रवास करुन पुन्हा मतदार संघात आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Addressed Media In Karad Satara News