केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राचे हाेतेय नुकसान : पृथ्वीराज चव्हाण

भद्रेश भाटे
Monday, 30 November 2020

पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता पक्षाचा, पर्यायाने सरकारचा पाठिंबा राहील. यासाठी महाआघाडीच्या राज्यभरातील उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

वाई (जि.सातारा) ः कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षीय पातळीवर विधान परिषदेची निवडणूक प्रथमच लढवित आहे. या निवडणुकीत नवे नेतृत्व घडत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
 
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड आणि व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ येथील बाजार समितीच्या शेतकरी हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, राजेंद्र तांबे, समिंद्रा जाधव, कॉंग्रेसचे शिवराज मोरे, रजनी पवार, धनश्री महाडिक, अल्पना यादव, बाबूराव शिंदे, विराज शिंदे, चंद्रकांत ढमाळ, शिवसेनेचे यशवंत घाडगे, डी. एम. बावळेकर, अजित यादव, किरण खामकर आदी उपस्थित होते.
 
श्री. चव्हाण म्हणाले, ""मोदी सरकारच्या काळात देशाचा विकास दर 9 टक्‍क्‍यांवरून तीन टक्‍क्‍यांवर आला. राज्यातील त्या पक्षाचे मागील सरकारने एकही प्रकल्प न करता फसव्या घोषणा केल्या. कोरोनामुळे विकास दरावर 25 टक्के परिणाम झाला. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची आर्थिक स्थिती आज चिंताजनक बनली. शेती, उद्योग या क्षेत्राला केंद्र शासनाने प्रोत्साहन दिले नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्राचे स्थान सहाव्या क्रमांकावर घसरले. तरुणांच्या नोकऱ्यांची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पदवीधर व शिक्षक यांसह सर्वच घटक नाराज आहेत. पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता पक्षाचा, पर्यायाने सरकारचा पाठिंबा राहील. यासाठी महाआघाडीच्या राज्यभरातील उमेदवारांना विजयी करा.''

महाविकास आघाडीची राज्यात दडपशाही : रणजितसिंह मोहिते-पाटील

मकरंद पाटील म्हणाले, ""कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत व्यक्तिगत संपर्क साधून आघाडीची भूमिका पटवून द्यावी. तिन्ही पक्षाचे हक्काचे मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.'' यशवंत घाडगे यांचेही भाषण झाले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाई तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद शिंदे यांचा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रताप पवार यांनी प्रास्ताविक केले. संगीता चव्हाण, लक्ष्मण पिसाळ, दीपक बाबर, कुमार जगताप, विलास मांढरे, राजेंद्र सोनावणे यांनी स्वागत केले. सचिन अनपट यांनी सूत्रसंचालन केले. रिपब्लिकन पक्ष (कवाडे), तालुका शिक्षक समिती, संघ, जिल्हा क्रीडा शिक्षक संघटना यांनी या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Prithviraj Chavan Criticises Modi Government Satara News