कांदा निर्यातबंदीविरोधात कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा; मंत्री जावडेकरांचे घुमजाव!

उमेश बांबरे
Wednesday, 16 September 2020

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चार जून रोजी कांदा, बटाटा व डाळींना जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा केली होती. परंतु, तीन महिन्यातच घुमजाव करत आपला निर्णय बदलून कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाद्वारे शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप डॉ. सुरेश जाधव यांनी केला आहे.

सातारा : जगभरात कोरोनाची महामारी असताना लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यास नुकताच चांगला भाव मिळण्याची शक्‍यता असतानाच केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी जाहीर करुन शासनाने शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने त्वरित कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केली.  

केंद्र शासनाच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे आज (ता. १६) दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा धनश्री महाडीक, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, बाबूराव शिंदे, राजेंद्र शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, बाळासाहेब शिरसाट, नरेश देसाई, सुषमा घोरपडे, मालन पडळकर आदींसह युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ग्राहकाला हसवतोय अन् शेतकऱ्याला रडवतोय कांदा!

डॉ. जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चार जून रोजी कांदा, बटाटा व डाळींना जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा केली होती. परंतु, तीन महिन्यातच घुमजाव करत आपला निर्णय बदलून कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाद्वारे शासनाने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तत्काळ निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे सांगितले.  या वेळी अतिरीक्त जिल्हाधिकारी थोरवे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Party Protests Against Onion Export Ban In Front Of Collector's Office Satara News