esakal | मुख्‍याधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पवारांचा राजीनामा; उदयनराजेंकडून गंभीर दखल!
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

या संभाषणाची क्‍लिप प्रसारित झाल्यानंतर त्‍याची दखल घेत खासदार उदयनराजे यांनी विकासकामांत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल करण्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.

मुख्‍याधिकाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या पवारांचा राजीनामा

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : भुयारी गटार योजनेच्‍या (Underground sewer scheme) ठेकेदारास तसेच मुख्‍याधिकारी अभिजित बापट (Chief Officer Abhijit Bapat) यांना उद्देशून वापरलेल्‍या एकेरी भाषेमुळे चर्चेत आलेल्‍या सातारा पालिकेच्‍या बांधकाम सभापती सिद्धी पवार (Construction Chairman Siddhi Pawar) यांनी आज आपला राजीनामा जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांच्‍याकडे सोपवला. या राजीनाम्‍यानंतर पवार यांनी पत्रकाव्‍दारे नगराध्‍यक्षा माधवी कदम (Mayor Madhavi Kadam) यांच्‍यावर टीका केली आहे. (Construction Chairman Of Satara Municipality Siddhi Pawar Resigned Satara Political News)

सातारा पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले असून, या कामादरम्‍यान बांधकाम सभापती सिध्‍दी पवार यांच्‍या प्रभागातील एका इमारतीच्‍या भिंतीचे नुकसान झाले होते. या भिंतीचे काम करून देण्‍यास विलंब झाल्‍याने पवार यांनी संबंधित ठेकेदारास फोन करत अर्वाच्य भाषेत दमदाटी केली होती. याचवेळी त्‍यांनी अभिजित बापट यांना उद्देशून एकेरी शब्‍द वापरले होते. या संभाषणाची क्‍लिप प्रसारित झाल्यानंतर त्‍याची दखल घेत खासदार उदयनराजे (MP Udayanraje Bhosale) यांनी विकासकामांत अडथळे आणणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल करण्‍याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.

हेही वाचा: कोरोनाचे नियम मोडल्यास हॉटेल-रेस्टाॅरंटना भरावा लागणार दहा हजारांचा दंड!

यानुसार संबंधित ठेकेदाराने पवार यांच्‍याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवली होती. याचदरम्‍यान पवार यांनी सभापतिपदाचा राजीनामा देत असल्‍याचे जाहीर केले होते. राजीनामा देण्‍याचे जाहीर केल्‍याच्‍या घटनेला आठ दिवस उलटले तरी तो न मिळाल्‍याने नगराध्‍यक्षा कदम यांनी पत्रकाव्‍दारे पवार यांच्‍यावर टीका केली होती. या आरोप-प्रत्‍यारोपांमुळे पवार आणि कदम पर्यायाने सातारा विकास आघाडीच्‍या कारभारावर शहरात चर्चेच्‍या फैरी झडू लागल्‍या. पवार यांनी आज आपल्‍या पदाचा राजीनामा जिल्‍हाधिकाऱ्यांकडे सोपवला. यात त्‍यांनी खालच्‍या स्‍तराला जाऊन झालेल्‍या बदनामीमुळे काम करणे अशक्‍य असल्‍याने राजीनामा देत असल्‍याचे नमूद केले आहे.

हेही वाचा: उदयनराजेंच्या सात समर्थकांना इंदापूरात अटक

काळ, वेळ तुम्‍हाला जागा दाखवेल...

राजीनामापत्र दिल्‍यानंतर सिद्धी पवार यांनी पत्रकाव्‍दारे नगराध्‍यक्षा माधवी कदम यांच्‍यावर टीका केली असून, काळ, वेळ तुम्‍हाला जागा दाखवून देईल, असे म्‍हटले आहे. राजकारणासाठी षडयंत्र करून माझी बदनामी करण्‍यात आली आहे. बेबनाव, कुरघोड्या करत गलिच्‍छ पातळीवर जाऊन राजकारण करणाऱ्यांसोबत काम करण्‍यापेक्षा राजीनामा दिलेला चांगला ठरणार असल्‍याने मी तो दिला आहे. षडयंत्र करून काम करणारे लोक संपवायचे, हा इतिहास सातारकरांना माहीत असून, येणारा काळच तुम्‍हाला जागा दाखवेल, अशा शब्‍दात कदम यांच्‍यावर टीका करत पवार यांनी पालिकेच्‍या आगामी निवडणुकीत भाजपचे स्‍वतंत्र पॅनेल टाकणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

Construction Chairman Of Satara Municipality Siddhi Pawar Resigned Satara Political News

loading image
go to top