कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरच कंटेन्मेंट झोन घोषित

कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरच कंटेन्मेंट झोन घोषित

दहिवडी (जि. सातारा) : शहरातील कोरोनाच्या (Covid19) उद्रेकाने धास्तावलेल्या प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झालेल्या बैठकीत संपूर्ण शहरच कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या सोमवारी आठवडी बाजार बंद होता. तसेच शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते.
 
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाची डोकेदुखी बनू लागली आहे. अपवाद वगळता दररोज लक्षणीय संख्येने कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. सध्या शहरात 71 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी 46 जण घरी विलगीकरणात आहेत. 25 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 71 हा आकडा प्रशासनासह सामान्यांच्या उरात धडकी भरवत आहे. शनिवार, रविवार व सोमवार शहरात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तीन दिवस बंद पाळण्यात आला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य पाहून पुन्हा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीस पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, पोलिस उपनिरीक्षक डॉ. प्रमोद दीक्षित, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत जगदाळे, कावेरी कदम, नगरसेवक समीर योगे, प्रशांत शिंदे, लिंगराज साखरे, महेंद्र जाधव, बाळासाहेब गुंडगे, शिवाजी शिंदे, महेंद्र कदम, रमेश जाधव आदी तसेच राजेंद्र गुंडगे, किसन सावंत आदी व्यापारी उपस्थित होते.
 
या वेळी बैठकीत शहरातील गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रुग्णांची संख्या पाहता संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात यावे, असे एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार पुढील दहा दिवसांसाठी कंटेन्मेंट झोनमधील सर्व प्रतिबंध शहरात लागू करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. जीवनावश्‍यक वस्तू नागरिकांना घरपोच कशा देता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. 
 

शहरातील परिस्थिती गंभीर असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नियम मोडणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. 

- शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com