सोनसाखळ्या गेल्या, कोरोना कधी जाणार? 'या' गावातील लोकांना चिंता

संजय जगताप
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावाने शहरांसह ग्रामीण भागातील लोकही आता भयभीत होऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणचा कोरोना तालुक्‍याच्या ठिकाणी आला आणि आता तर शेजारच्या व स्वतःच्याही गावात येऊन पोहचला आहे.

मायणी (जि.सातारा) : रोजगार व कामधंद्याअभावी गाठीला बांधलेले चार पैसे संपले. दैनंदिन जगण्याच्या लढाईत घरातील किडूक-मिडूक खर्च झाले. जपून ठेवलेली सोनसाखळीही गेली. आता जगायचं तरी कसं? कोरोना जाणार तरी कधी? अशी चिंता आता सर्वसामान्यांना अस्वस्थ करीत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाने शहरांसह ग्रामीण भागातील लोकही आता भयभीत होऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणचा कोरोना तालुक्‍याच्या ठिकाणी आला आणि आता तर शेजारच्या व स्वतःच्याही गावात येऊन पोहचला आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या वाढीला आळा बसावा. कोरोनाची साखळी तुटावी. लोकांचे दैनंदिन जीवन लवकरच पूर्वपदावर यावे. या उद्देशाने प्रशासनाकडून सतत लॉकडाउन जाहीर करण्यात येत आहे. त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्य नागरिकांना पोहचत आहे. त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

उद्योगधंद्यासह विविध व्यवसाय बहुतांशी बंद असल्याने रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. हाताला काम नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात अशा बेरोजगार झालेल्या, हातावरचे पोट असणाऱ्या समाजातील अनेक घटकांना विविध संस्था, मंडळे, दानशूरांनी मदतीचा हात दिला. अन्नछत्रे उघडली. सामानाचे पॅकेज पुरवले. मात्र, महिना-दोन महिने झाले. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे चिन्ह दिसेना. परिणामी मदतीला मर्यादा येऊन बहुतेकांकडून मिळणारी मदत थांबली. त्यामुळे मदतीवर विसंबून असणाऱ्या सर्वसामान्यांची जगण्याची लढाई दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे.

प्रत्येकाला जगण्याचे नवे साधन शोधावे लागत आहे. रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. अशा लोकांनी नाईलाजास्तव भविष्याची तरतूद म्हणून घरातील गाठीला बांधून ठेवलेले चार पैसे खर्च केले. दैनंदिन खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी घरातील किडूक-मिडूक बाहेर काढले. अडचणीच्या काळात उपयोगी पडेल म्हणून जिवापाड जपलेली सोनसाखळीसारखे दागिनेही खर्च झाले, तरीही कोरोनाची साखळी तुटता तुटेना दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचे आणि कसे जगायचे असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहे.

दरम्यान, वाढत्या दैनंदिन खर्चामुळे लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. हात उसने वा कर्जही कुणी देईनात. अशा स्थितीत पैसा कुठून आणि कसा उभा करायचा, या चिंतेने समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच प्रशासनाकडून सतत लॉकडाउन जाहीर केले जात आहे. अनेक निर्बंध घातले जात आहेत. स्थानिक पातळीवर वेगळेच निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे "दुष्काळात तेरावा महिना' असा अनुभव येत आहे. 

 मायणी येथील व्यावसायिक संभाजी देशमुख म्हणाले, कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांचे अतोनात हाल सुरू आहेत. उद्योगधंद्यांची तर पुरती वाट लागली आहे. कधी एकदा कोरोना संपतोय असं झालं आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona has made life difficult for many poor people