'फॅबिफ्लू'च्या सरसकट वापरावर नियंत्रण; साताऱ्यात महत्वाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fabiflu

फॅबिफ्लू गोळ्यांच्या (Fabiflu Tablet) सरसकट वापरावर जिल्हा रुग्णालयात नियंत्रण आणण्यात आले आहे.

'फॅबिफ्लू'च्या सरसकट वापरावर नियंत्रण; साताऱ्यात महत्वाचा निर्णय

सातारा : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) उपचारात सर्रास वापरल्या जाणाऱ्या फॅबिफ्लू गोळ्यांच्या (Fabiflu Tablet) सरसकट वापरावर जिल्हा रुग्णालयात नियंत्रण आणण्यात आले आहे. तीव्र लक्षणे असलेल्यांनाच या गोळ्यांचा डोस दिला जात आहे. त्यातून या गोळ्यांच्या जादा डोसच्या संभाव्य दुष्परिणाम टाळण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयामध्ये आरटीपीसीआर (RTPCR) लॅबच्या शेजारीच कोरोना ओपोडीची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी लक्षणे असलेल्यांना केसपेपर, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रॅट, तसेच आरटीपीसीआर चाचणीची शिफारस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आवश्यक ती औषधे देण्याची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्याच्या विविध भागांतील हजारो रुग्णांनी आजवर घेतलेला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त होण्यास याची मदत झाली आहे.

हेही वाचा: घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत; माजी मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या केंद्रावर सरसकट प्रत्येक कोरोना बाधिताला फॅबिफ्लूच्या गोळ्या दिल्या जात नव्हत्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोना ओपीडीमध्ये कोरोना बाधिताला सरसकट या गोळ्या मिळत होत्या. या गोळ्यांचा डोसही जास्त आहे. पहिल्या दिवशी बहुतांश जणांना नऊ-नऊ, तर त्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ चार- चार गोळ्यांचा डोस रुग्णाला सांगितला जातो. त्यामुळे या गोळ्यांसाठी रुग्णाला खासगीत पाच दिवसांसाठी हजार ते १२०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत होते. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना या गोळ्यांचा फायदाही झाला आहे; परंतु त्याच्या वापराचे काहींना दुष्पपरिणामही जाणवले होते. काहींना गोळ्या सहन होत नव्हत्या. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय सेवा देणारे अनेक जनरल फिजिशियन नेहमीच्या माहितीच्या रुग्णांना या गोळ्या देणे शक्यतो टाळत होते. अगदी आवश्यकता भासल्यासच तीव्र लक्षणे असल्यास किंवा लक्षणे वाढत असल्यास या गोळ्यांचा वापर करत आहेत. त्यातून या गोळ्या न देताही अनेक रुग्ण बरे होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: कोविडमुक्त गावांत शाळा होणार सुरू; ग्रामस्तरावर समिती स्थापन!

फिजिशिअनच्या सल्ल्यानेच आता ही औषधे

जिल्हा रुग्णालयातील कोरोना ओपीडीमध्येही आता सरसकट या गोळ्या देणे बंद करण्यात आले आहे. अगदी सौम्य किंवा काही लक्षणे नसलेल्या रुग्णांना या गोळ्यांचा डोस दिला जात नाही. अन्य औषधांनीच या रुग्णांवर उपचार होत आहेत; परंतु या गोळ्या देणे पूर्णतः बंदही करण्यात आलेले नाही. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना फिजिशिअनच्या सल्ल्यानेच आता ही औषधे देण्यात येत आहेत. त्यातून आवश्यकता नसताना या गोळ्यांचा डोस देऊन संभाव्य दुष्परिणाम टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Corona Impact 2021 Temporary Ban On Use Of Fabiflu Tablet In Satara District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top