वाढविलेल्या मनोबलामुळेच 14 जणांची कोरोनावर मात : धनंजय गोडसे

आयाज मुल्ला
Sunday, 18 October 2020

क्वारंटाइनच्या चौदा दिवसांच्या काळात डॉक्‍टरांनी दिलेले औषधोपचार तसेच वाफारा, आयुर्वेदिक काढा, सकस आहार तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेणे असे घरगुती उपचार केले.

वडूज (जि. सातारा) : कुटुंबातील आम्ही 14 जण एकाचवेळी कोरोनाबाधित झाल्यानंतर आम्ही सर्वजण काहिसे हबकलेलो होतो. डॉक्‍टरांनी दिलेली औषधे शिवाय घरगुती आयुर्वेदिक उपचार, मित्रमंडळी व नातलगांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे आम्ही सर्वांनीच कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असे येथील कापड दुकानदार धनंजय गोडसे यांनी नमूद केेले.

गाेडसे म्हणाले, कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आम्ही दुकानात सर्व ती काळजी घेत होतो. मात्र, अचानक एकेदिवशी मला थंडी, ताप आला. त्यानंतर प्राथमिक उपचार घेऊन तपासणी केली. तेव्हा मी कोरोनाबाधित झाल्याचे समजले. त्यानंतर घरातील सर्वांचीच कोरोना चाचणी करावी लागली. त्यामध्ये आई श्रीमती रोहिणी, थोरले बंधू महेश, विजय यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुले, मुली तसेच माझी पत्नी, दोन मुले अशा अन्य 13 जणांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. सुदैवाने आम्हाला कोणताही विशेष त्रास जाणवत नव्हता. सर्वांचीच ऑक्‍सिजन लेव्हल चांगली होती. शिवाय सर्वांच्या एचआरटीसी टेस्टही नॉर्मल होत्या. त्यामुळे डॉक्‍टरांनीही न घाबरण्याचा सल्ला दिला. शिवाय सर्वांनीच घरी राहून उपचार घेण्याची तयारी दर्शविली. केवळ वृद्ध आई व थोरले बंधू महेश यांना मायणीला क्वारंटाइन व्हावे लागले होते.

प्रवास होणार सुखकर! म्हसवड-नाशिक बससेवेस प्रारंभ
 
क्वारंटाइनच्या चौदा दिवसांच्या काळात डॉक्‍टरांनी दिलेले औषधोपचार तसेच वाफारा, आयुर्वेदिक काढा, सकस आहार तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घेणे असे घरगुती उपचार केले. विशेषत: या 14 दिवसांच्या काळात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विवेकानंद माने (वडूज), डॉ. अजित पवार (खटाव), शशिकांत गोडसे आदी मित्रांचे तसेच जवळच्या नातलगांचे चांगले सहकार्य लाभले. घरातील किराणा साहित्य, मेडिकलमधून औषधे आणून दिली. मित्रमंडळी, नातेवाईकांनी फोन करून आम्हा सर्वांनाच आधार दिला, आमचे मनोबल वाढविले त्यामुळे आम्ही 14 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronafighter Dhanjay Goadse Expressed Views After Recovered From Covid 19 Satara News