डगमगलाे नाही; माझ्यासह कुटुंबातील 11 लोकांना कोरोनामुक्त केले : डाॅ. दिलीप साेलंकी

सचिन शिंदे
Tuesday, 20 October 2020

गरम पाणी, वाफारा, योग्य वेळचे औषधोपचार, गुळण्या घेणे आदी सगळ्यामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. कोरोनामुक्त होतो मात्र पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आजार वाढले आहेत. त्याबाबतही तितकीच काळजी घेण्याची गरज आहे.

कराड : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्‍टर म्हणून तीन दशकांपासून कार्यरत आहे. मात्र, तरीही कोरोनाग्रस्त झालो. मी स्वतः न डगमगता कोरोनाला हरवले आणि कुटुंबातील 11 लोकांनाही कोरोनामुक्त केले. आता आम्ही कोरोनामुक्त झालो असलो, तरी कोरोनामुक्तीनंतरच्या आजारांबाबत काळजी घेत आहोत असे डाॅ. दिलीप साेलंकी यांनी नमूद केले. 

डाॅ. साेलंकी म्हणाले, कऱ्हाडला कोरोनाचा कहर सुरू होता. त्या वेळी माझी ओपीडी बिनधास्त सुरू होती. त्या काळात एखाद्या रुग्णाकडून स्वतः बाधित झालो. माझा 15 ऑगस्टला अहवाल पॉझिटिव्ह आला. मी कृष्णा रुग्णलायात दाखल झालो. दुसऱ्या दिवशी पत्नीही पॉझिटिव्ह आली. त्याच वेळी घरातील अन्य दहा सदस्य पॉझिटिव्ह आले. प्रत्यक्षात मी, पत्नी व माझा भाऊच रुग्णालयात दाखल झालो. त्या काळात आजारावर नियंत्रण ठेवताना कसरत होती. अन्य घरातील लोकांना होम क्वारंटाइन केले होते. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेऊन होतो. त्यांना योग्य औषधोपचारही करत होतो. सल्ले देत होतो.

धामणगावात किन्नरांनी मांडला देवीचा जागर; मास्क घाला, देवीचे दर्शन घ्या

कृष्णा रुग्णालयात उपचार घेताना योग्य वेळचा औषधोपचार, सकस आहार आणि सकारात्मक मानसिकतेमुळे कोरोनामुक्त झालो खरे. मात्र, त्यातही कोरोनामुक्तीने बरेच काही शिकवले. त्याहीपेक्षा कोरोनामुक्तीनंतर होणारे आजारही बळावू शकतात, याची जाणीव झाली. त्या आजाराची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असेच आता तरी जाणवते. त्याबाबत जागृती करतो आहे. त्यामुळे मी व माझे कुटुंब कोरोनामुक्त झालो असलो, तरी त्यांची कोरोनामुक्तीनंतरच्या आजाराबाबत आम्ही काळजी घेत आहोत. लोकांनाही काळजी घेण्यास सांगत आहे.

कोरोनाची अनामिक भीती कोणीही बाळगू नये, अशीच आमची विनंती राहील. वेळेत औषध घेणे, सकस आहार घेणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे आणि शक्‍य तेवढा आराम करण्याची गरज आहे. तुम्ही कोरोनामुक्त होता. कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या आजारांची भीती वाढली आहे. त्याचा धोका अधिक गतीने वाढतो आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुम्ही कोरोनामुक्ती झालात, की शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे, अशक्तपणा येणे, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होत आहेत. त्या आजारावर मात करतानाही तुम्हाला योग्य औषधोपचार घेण्याची आवश्‍यकता आहे. काळजी घेण्याची गरज आहे. गरम पाणी, वाफारा, योग्य वेळचे औषधोपचार, गुळण्या घेणे आदी सगळ्यामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. कोरोनामुक्त होतो मात्र पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आजार वाढले आहेत. त्याबाबतही तितकीच काळजी घेण्याची गरज आहे. 

संपादन - सिद्धार्थ लाटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronafighter Dilip Solankhi Expressed Views After Recovered From Covid 19 Satara News