
भिलार (जि. सातारा) : जिल्ह्यातील सर्पदंशाच्या रुग्णांची कोरोनाच्या गर्दीत होरपळ होत असून, शासकीय रुग्णालयांतही या रुग्णांकडे डोळेझाक होत असल्याने उपचारासाठी धावाधाव करताना प्रसंगी काही रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यावर आरोग्य यंत्रणेने विचार करणे गरजेचे आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून, ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असल्याने बरेच शेतकरी, महिला शेतात काम करत आहेत. हे काम करताना रानटी प्राण्यांबरोबरच साप, विंचू यांचाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही गावांमध्ये तर सर्प लोकवस्तीत येऊन घरातही शिरत आहेत. त्यामुळे त्यांची धास्ती ग्रामीण भागातील लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याचदा घरकाम करताना तसेच झोपेत असतानाही हे साप, विंचू चावा घेवून जखमी करत आहेत. अशा शेतात अथवा घरात दंशाच्या घटना घडल्या की लगेच लोक जिवाची पर्वा न करता शासकीय रुग्णालये गाठतात. मात्र, त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी कसलीही रिस्क न घेता साताऱ्याला जाण्याच्या सूचना देतात. मग आणखी कसरत करत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्यांना सातारा गाठावे लागत आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाची घावपळ सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेचे इतर रुग्णांकडून पाहण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अशा काही रुग्णांवर सातारा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये प्रवेश मिळतो. पण, उपचारांत हेळसांड होत आहे तर काहींना तर तेथील यंत्रणा थातूरमातूर कारणे देवून खासगीचा रस्ता दाखवतात, हे वास्तव आहे. आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी आटापिटा करणारे नातेवाईक मग खासगीच्या वारीचा आसरा घेतात. पण, या पळापळीत काही रुग्णांचा जीवही जात आहे. काही यातून खासगीत भरमसाट पैसे मोजून रुग्ण घरी आणत आहेत. मग शासकीय यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे.
सध्या पावसामुळे असे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे व्यवस्थेचे बळी ठरणाऱ्या या रुग्णांसाठी वरिष्ठ व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून स्थानिक रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांत लस उपलब्ध करून त्यांच्यावर उपचाराची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
""सध्या पावसाळ्यामुळे ग्रामीण भागात सर्पदंशाचे रुग्ण वाढत असून, बऱ्याच रुग्णांना शासकीय रुग्णालयांचा जाच सहन करावा लागत आहे. नातेवाईक उपचारासाठी लोकप्रतिनिधी, ओळखीपाळखीच्या लोकांकडे गयावया करतात. पण, तेथेही त्यांना आश्वासन मिळते. नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. तेव्हा शासकीय आरोग्य यंत्रणेला वठणीवर आणण्यासाठी खरोखरच कुणीतरी पुढे येणे गरजेचे आहे.''
-सतीश गलगले, माजी सरपंच, रामवाडी
संपादन : पांडुरंग बर्गे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.