Crime news: महामार्गावर ‘कुरिअर’चे वाहन अडवून ११ तोळे सोने, १७ किलो चांदीचे दागिने लुटले

अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.
Crime
Crimeesakal

काशीळ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका कुरिअर कंपनीच्या वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची अज्ञातांनी लूट केल्याची घटना घडली आहे. फिर्यादीनुसार लूट झालेल्या ११० ग्रॅम सोने व १७ किलो चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे १७ लाख ६२ हजार असून, अज्ञात चोरटे या घटनेनंतर पसार झाले.

काशीळ (ता. सातारा) परिसरात रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. संतकुमार उरणसिंग परमार (वय २५, सध्या रा. भेंडी गल्ली, शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर, मूळ रा. जारगा ता. बसेरी, जि. धौलपूर, राजस्थान) यांनी एकूण नऊ अज्ञात चोरट्यांविरोधात बोरगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथून संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार हे शनिवारी रात्री १० वाजता साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅन (एमएच ४० बीपी ८४२७) मध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला अज्ञात चोरट्यांनी मोटार आडवी मारून गाडी जबरदस्तीने थांबवली.

त्यानंतर चारचाकी मोटारीतून चार अज्ञात चोरटे पटकन खाली उतरून त्यांनी संतकुमार परमार व गोलू परमार यांच्या तोंडावर वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून जबरदस्तीने खाली उतरविले. त्याचवेळी पाठीमागून दोन दुचाकींवरून आलेल्या चार व्यक्तींनी संतकुमार परमार व गोलू परमार यांना पकडून ठेवले.

त्यावेळी चोरट्यांनी परमार यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह जबरदस्तीने घेऊन गेले. त्यानंतर संतकुमार परमार व गोलू परमार यांना पकडून ठेवणारे दुचाकीस्वारसुद्धा त्यांना रस्त्याच्या कडेला ढकलून देऊन निघून गेले. चोरट्यांनी कुरिअरची गाडी थोड्याच अंतरावर असलेल्या समर्थगाव (ता. सातारा) येथे नेऊन गाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील फक्त सोन्या-चांदीचे दागिन्यांचे बॉक्स व गाडीची किल्ली घेऊन पसार झाले.

मध्यरात्री घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांनी पहाटेच घटनास्थळी भेट दिली. बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथक तसेच क्यूआरटीच्या टीमने काशीळचा परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.

सात संशयित पकडले

दरम्यान, या घटनेनंतर चोरट्यांच्या मागावर पोलिस पथके पाठविण्यात आली असता सातारा पोलिसांना तीन तर पुणे पोलिसांना चार अशा सात संशयितांना पकडण्यात यश आल्याचे सातारा पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com