...तर आईचे प्राण वाचले असते; खुनानंतर अनिकेतचा आक्रोश

सचिन शिंदे
Monday, 31 August 2020

खुनाच्या घटनेनंतर दाजी येडगे हे गायब झाल्याचे समजताच काहींनी शोधाशोध केली. पुणे-बंगळूर महामार्गाकडेला ते फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शोधणाऱ्या नागरिकांनी दाजीला ताब्यात घेऊन घरी आणले.

मलकापूर (जि. सातारा) : पती-पत्नीच्या वैयक्तिक वादातून पत्नीचा खून झाल्याची घटना रविवारी (ता.30) सकाळी उघडकीस आली. मंगल दाजी येडगे (वय 50, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. दाजी आनंदा येडगे (पती, वय 54, रा. मलकापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत महिलेचा भाऊ विलास महादेव सोनके (रा. मलकापूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : येथील मुख्य रस्त्यालगत शिवाजी चौक परिसरात दाजी येडगे, पत्नी मंगल व मुलगा अनिकेत वास्तव्यास होते. दाजी व मंगल येडगे यांच्यात घरगुती कारणांमुळे वारंवार भांडणे होत होती. चार दिवसांपूर्वीच अनिकेत व विलास या दोघांनाही दाजीला समजावून सांगितले होते. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात मंगल यांना वजनदार वस्तूने मारहाण झाली. त्यातच डोक्‍याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

राज्यभरात कीड नियंत्रण ‘अनियंत्रित’; दरवर्षी निम्मे पीक होते उद्‍ध्वस्त 

खुनाच्या घटनेनंतर दाजी येडगे हे गायब झाल्याचे समजताच काहींनी शोधाशोध केली. पुणे-बंगळूर महामार्गाकडेला ते फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शोधणाऱ्या नागरिकांनी दाजीला ताब्यात घेऊन घरी आणले. या प्रकरणी पोलिसांनी दाजी येडगेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह सराटे, हवालदार सुनील पन्हाळे, हवालदार बर्गे घटनास्थळी दाखल झाले.

लाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; माहेश्वरीची काैतुकाची थाप 

अनिकेतचा आक्रोश... 

येडगे दाम्पत्याला तीन विवाहित मुली, नातवंडे व एक मुलगा असा परिवार आहे. सध्या येडगे दांपत्य व त्यांचा मुलगा अनिकेत हे वास्तव्यास होते. आज पहाटे या दाम्पत्यामध्ये भांडण सुरू होते. यावेळी साखरझोपेत असलेल्या अनिकेतच्या कानावर भांडणाचा आवाजही आला. मात्र, आई-वडिलांचे नेहमीचेच भांडण म्हणून त्याने दुर्लक्ष केले. तो उठून गेला असता किंवा भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर आईचे प्राण वाचले असते, असे अनिकेतने आक्रोश करत बोलून दाखवले.

सातारकरांनाे... रुग्णांसाठी बेड मिळत नाहीये, मग हे वाचा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News Karad Police Registered Case Against Husband Who Beats Wife