एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चाकूने भोकसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime one sided love college student was stabbed satara

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चाकूने भोकसले

पिंपोडे बुद्रुक : येथे एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तरुणाने चाकूने भोकसले. आज सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. जखमी मुलीला बेशुद्धावस्थेत साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी निखिल राजेंद्र राजे (वय.२६,रा. पिंपोडे बुद्रुक) हा कोरेगाव पोलिस स्टेशनला हजर झाला असून तो तणनाशक पिल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील बसस्थानक परिसरात पेट्रोल पंपानजीक एक खासगी क्लास आहे.

संबंधित विद्यार्थिनी इयत्ता ११ वी वाणिज्य शाखेत शिकत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ती क्लाससाठी आली होती. क्लास साडे नऊ वाजता सुरु होणार होता. त्यामुळे शिक्षक उपस्थित नव्हते. दरम्यान या परिसरात दबा धरून बसलेला आरोपी निखिल हा तत्पूर्वीच क्लासमध्ये आला. त्याच्या हातात चाकू होता. काही समजण्यापूर्वी त्याने विद्यार्थिनीच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे या ठिकाणी रक्ताचा सडा पसरला. या प्रकाराने क्लासमध्ये खळबळ उडाली. मुलीला जखमी अवस्थेत शेजारील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी तिला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आरोपी तरुणाने गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच स्कूल bag घटनास्थळी आढळून आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान या प्रकाराने कोरेगावच्या उत्तर भागात खळबळ उडाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.