लहरी वातावरण शेतीच्या मुळावर; माणदेशात उत्पादन घटण्याची भीती, शेतकरी संकटात

लहरी वातावरण शेतीच्या मुळावर; माणदेशात उत्पादन घटण्याची भीती, शेतकरी संकटात

दहिवडी (जि. सातारा) : सातत्याने बदलणारे लहरी व दूषित वातावरण शेतीच्या मुळावर उठणारे ठरताना दिसत आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अजून संकटात सापडला आहे. बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. 

माणमधील शेतकऱ्याला यंदाच्या वर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी पेरणीच होऊ शकली नाही तर अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कसंबसं स्वतःला सावरत शेतीची मशागत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला व पुन्हा एकदा शेतकरी हतबल झाला. खरीप हंगाम हातातून गेल्याने खचलेल्या शेतकऱ्यांनी या सगळ्यातून सावरत रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी उसनेपासने करून सावकाराकडून कर्ज घेऊन मशागत केली. कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, लसूण, कांदा तरू, वाटाणा, घेवडा या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी, लागण करण्यात आली. मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगाम चांगला करायचा निर्धार करून शेतकरी कामाला लागले. चांगल्या वातावरणामुळे पिकेसुध्दा बहरात आली होती. मात्र, पुन्हा एकदा लहरी निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. 

कधी ऊन तर कधी थंडी, कधी धुके तर कधी हलका पाऊस, कधी कधी दिवसभर ढगाळ वातावरण व जोराचा वारा. या असल्या विचित्र व दूषित वातावरणामुळे बहरात आलेल्या पिकांवर रोगराईचा हल्ला झाला. कांदा व लसणाला पांढरी होप, मावा व बुरशी यांनी ग्रासले. ज्वारीवर चिकटा पडला, गव्हावर तांबेरा पडला. हरभऱ्यावर घाटआळी व मावा तर वाटाणा बुरशी व अळीने ग्रस्त झाले. काही पिके पूर्णपणे नष्ट झाली तर काही पिकांचे खुप नुकसान झाले. यामुळे एकतर उत्पन्न मिळणार नाही अन्‌ मिळाले तर त्यात मोठी घट होणार आहे. पिके हातातून जाऊ नयेत व काहीतरी उत्पन्न मिळावे, म्हणून शेतकरी कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा बेसुमार वापर करत आहेत. त्यामुळे खर्चात भरमसाट वाढ होऊ लागली आहे. त्यामानाने उत्पन्न मिळणार नाही तसेच मिळणाऱ्या उत्पन्नाची खात्री देता येत नाही. या सर्व परिस्थितीमुळे माणमधील शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अजून हे लहरी वातावरण शेतकऱ्यांची किती परीक्षा घेणार, याचा भरवसा नाही. त्यामुळे इथला शेतकरी हताश होताना दिसत आहे. 

लहरी वातावरणाचा शेतकऱ्यांच्या एकूणच जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. या दूषित वातावरणाचा फटका पिकाला बसला आहेच; पण त्यामुळे आलेल्या आर्थिक संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. 
-आप्पा बोराटे, शेतकरी, बोराटवाडी 
.......................................................

सध्याचे वातावरण शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारे आहे. या वातावरणाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तरच पुढील नुकसान टळू शकेल. 
-विनय पोळ, कृषी सेवा केंद्रचालक, दहिवडी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com