मसूरला पावसामुळे पीक काढणीस व्यत्यय; शेतकरीवर्ग चिंतेत

गजानन गिरी
Friday, 25 September 2020

सोयाबीन पीक काढून रब्बी हंगामातील शाळू पिकाची पेरणी करण्यासाठी सोयोबीन काढण्याची शेतकरी गडबड करत आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. लवकर पेरणी झाल्यास शाळवाचे उत्पादन चांगले मिळते. गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काढताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मसूर (जि. सातारा) : विभागात खरीप हंगामातील कडधान्याची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. भुईमूग, सोयाबीन पिकाच्या काढणी, मळणीस प्रारंभ झाला आहे. सोयाबीन काढणीचा एकरी दर अडीच हजारापासून तीन हजार रुपयांपर्यंत आहे. त्यात दररोज येणाऱ्या अवकाळी पावसामुळे कडधान्य काढणीसह सोयाबीन, भुईमूग काढण्यात व्यत्यय येत आहे. 

सोयाबीन पीक हे जिरायतीसह बागायती क्षेत्रावर शेतकरी उत्पादन घेतात. दहा जूनदरम्यान पेरणी झालेले सोयाबीन काढण्यास सुरवात झाली असून, त्याची मळणी शेतकरी करीत आहेत, तर काही शेतकरी त्याचे बुचाड लावत आहेत. बुचडाची मळणी एका महिन्यानंतर केली जाते. सोयाबीन हे पीक 90 ते 95 दिवसांत काढणीला येते. यावर्षी वेळेत पावसाला सुरवात झाल्यामुळे दहा जून ते 20 जूनच्या दरम्यान मसूर विभागात पेरण्या झाल्याने सोयाबीन काढणी, मळणीचा हंगाम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

डॉ. विकास पाटलांच्या वायुशोधक यंत्रास पेटंट; भारत सरकारकडून 53 लाखांचे अनुदान

सोयाबीन पीक काढून रब्बी हंगामातील शाळू पिकाची पेरणी करण्यासाठी सोयोबीन काढण्याची शेतकरी गडबड करत आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. लवकर पेरणी झाल्यास शाळवाचे उत्पादन चांगले मिळते. गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन काढताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन जादा पावसाने वाया गेले आहे. पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी सोयाबीनची काढणी आणि मळणी करत आहेत. यावर्षी सोयाबीन काढणीचा एकरी दर अडीच हजारांपासून तीन हजार रुपये असून, अनेक शेतकरी सोयाबीन काढणी अंगावर देत आहेत. जादा पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाला गेल्या वर्षीच्या तुलनेत उतारा कमी पडत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Damage Due To Rains At Masur Satara News