सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 15 October 2020

दरम्यान, रविवारपासून (ता. 18) पाऊस आपला गाशा गुंडाळेल, गारवा वाढेल व धुके पडायला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

सातारा : बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले. हे चक्रीवादळ आज (ता. 15) सातारा जिल्ह्यात धडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे माण, खटाव, कोरेगाव, साताऱ्यासह जिल्हाभर वादळासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
 
चक्रीवादळ मंगळवारी पहाटे विशाखापट्टण किनारपट्टीवरून हैदराबादमार्गे नांदेड, असा प्रवास करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ते हैदराबादच्या दक्षिणेला सरकले. त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाला. मात्र, नांदेड टळल्याने ते दक्षिण नगर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्‍यता कमी झाली. नांदेडऐवजी सोलापूर शहरापासून सुमारे 160 किलोमीटरवर कर्नाटकच्या सीमेवर आज (बुधवारी) पहाटे ते केंद्रित झाले होते. दक्षिण नगर जिल्ह्याऐवजी आज (गुरुवारी) ते कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथून महाराष्ट्रात प्रवेश करील. सायंकाळी ते सातारा व वडूजला पोचेल. सातारा व वडूज ही ठिकाणे चक्रीवादळाचे केंद्र असेल. हे अंतर नगर शहरापासून 200, तर भीमा नदीकाठच्या श्रीगोंदे तालुक्‍यापासून सुमारे 120 किलोमीटरवर आहे. या वादळाचा प्रभाव चारही दिशांना 100 किलोमीटरपर्यंतच आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पलीकडे पावसाचे प्रमाण वाढेल. सातारा व वडूज भागात वादळी पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

ढिंग टांग! : देवस्थान!
 
हे चक्रीवादळ आज (गुरुवारी) सायंकाळी मुंबईच्या दिशेने कूच करायला सुरवात करील. मात्र, त्याने यापूर्वीच दिशा बदलली असल्याने, मुंबईत न जाता रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी बंदरातून ते अरबी समुद्रात प्रवेश करील. त्याच्या या संभाव्य मार्गात वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, रविवारपासून (ता. 18) पाऊस आपला गाशा गुंडाळेल, गारवा वाढेल व धुके पडायला सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

गुन्हेगारांवर वचक निर्माण करुन जनतेचा विश्वास जिंका : पृथ्वीराज चव्हाण
 

हवामान खात्याच्या संकेतस्थळानुसार दिशा काहीशी बदलून चक्रीवादळ दक्षिणेकडे सरकल्याने, दक्षिण नगर जिल्ह्यात त्याच्या प्रवेशाचा धोका टळला आहे. उद्या ते सातारा व वडूज भागात केंद्रित होईल. तेथे वादळी पाऊस होईल. 

- उत्तमराव निर्मळ, निवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyclone Passed Through Andra Pradesh Satara Koregoan Satara News