दहिवडीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा; नूतन निवडीकडे सर्वांचे लक्ष

रुपेश कदम
Thursday, 24 September 2020

प्रथम नगराध्यक्षा म्हणून साधना गुंडगे यांना अडीच वर्षे संधी मिळाली होती. त्यानंतर नगराध्यक्षपद खुले झाल्यानंतर दिलीप जाधव हे 14 जून 2019 रोजी नगराध्यक्ष झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सतीश जाधव यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. 31 जानेवारी रोजी सतीश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.

दहिवडी (जि. सातारा) : येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सतीश जाधव यांनी राजीनामा दिला असून, नूतन नगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीवर आमदार जयकुमार गोरे गटाचे वर्चस्व आहे. सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत आमदार गोरे यांचे 11, राष्ट्रवादीचे सहा, तर एक अपक्ष असे नगरसेवक आहेत. 

प्रथम नगराध्यक्षा म्हणून साधना गुंडगे यांना अडीच वर्षे संधी मिळाली होती. त्यानंतर नगराध्यक्षपद खुले झाल्यानंतर दिलीप जाधव हे 14 जून 2019 रोजी नगराध्यक्ष झाले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सतीश जाधव यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. 31 जानेवारी रोजी सतीश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. सोमवारी सतीश जाधव यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. लवकरच नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. 

अर्थ विभागाचे अन्यायकारक परिपत्रक रद्द करा : उमेद कर्मचाऱ्यांची मागणी

दिलीप जाधव यांना साडेसहा महिने, तर सतीश जाधव यांना साधारण पावणेआठ महिने कार्यकाल मिळाला. पक्षांतर्गत बैठकीत ठरल्याप्रमाणे इतरांना संधी देण्यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांनी राजीनामा दिला आहे. विद्यमान सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. उर्वरित कालावधीसाठी आमदार गोरे गटाचे खुल्या गटातील नगरसेवक धनाजी जाधव हे प्रबळ दावेदार आहेत. सत्ताधारी गटाचे संधी न मिळालेले ते एकमेव नगरसेवक आहेत. त्यामुळे आमदार गोरे हे धनाजी जाधव यांना नगराध्यक्षपदाची संधी देतील, अशी शक्‍यता आहे. परंतु, सत्ताधारी गटाकडून खुल्या गटातून निवडून आलेल्या तीन महिला नगरसेवकांची सुध्दा नगराध्यक्ष होण्याची सुप्त इच्छा दिसत येत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahivadi Mayor Resigns Satara News