ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम; बटाटा-कांद्यावर मावा, तुडतुडे, करप्याचा प्रादुर्भाव

सलीम आत्तार
Sunday, 22 November 2020

कांद्याला चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे कांदा न पोसणे, मर रोगाचा प्रादुर्भाव तसेच कांदा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

पुसेगाव (जि. सातारा) : सध्याच्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब होऊन पुसवडी बटाटा व लागण झालेल्या कांदा रोपावर मावा, तुडतुडे व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होणाऱ्या औषधोपचारांवर अमाप खर्च होत आहे, तर हवामानाची ही परिस्थिती आणखी दोन महिने राहिल असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने रब्बी हंगामाची पिके हाती लागतील किंवा नाही अशी शक्‍यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले, पावसाळा संपून दिवाळीनंतर थंडीला प्रारंभ झालेला असतानाच सध्या सततच्या ढगाळ हवामानमुळे थंडी गायब झाली आहे. पुसेगाव परिसरात बटाटा व कांदा ही दोनच महत्वाची नगदी पिके असून, या पिकांची परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी प्रती किलो तीन ते चार हजार रुपयांचे कांदा बियाणे तर पुसवडी बटाट्याच्या कुपराज व ज्योती या दोन वाणांचे बियाणे प्रति क्विंटल पाच ते नऊ हजार रुपये दराने खरेदी करुन लागवड केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, बटाटा व अन्य पिके कुजून गेल्यामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला होता. 

प्रतापगडच्या गळीतास कामगारांचा विरोध; आक्रमक पवित्र्याने कारखाना प्रशासनाला जाग येणार?

कांद्याला चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. परंतु, अतीवृष्टीमुळे कांदा न पोसणे, मर रोगाचा प्रादुर्भाव तसेच कांदा वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व बटाट्याचे महागडे बियाणे खरेदी करुनही व व्यापारी वर्गाकडून त्याबाबत खात्री दिली जात नसतानाही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या आशेने कांदा व पुसवडी बटाट्याची लागवड केली आहे. परंतु, सध्या सततच्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा, तुडतुडे व करप्याचा मोठा प्रादुर्भाव जाणवत असून, या रोगांना आळा घालण्यासाठी होणाऱ्या औषधोपचारावर अमाप पैसे खर्च होत आहेत. ढगाळ हवामानाची अशीच स्थिती कायम राहिली तर रब्बी हंगामही हातचा जाऊन मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage To Potato Onion Crop Due To Cloudy Weather Satara News